व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST2021-01-24T04:14:51+5:302021-01-24T04:14:51+5:30

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच ...

Loss of papaya growers due to arbitrariness of traders | व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच अनुषंगाने पपई व्यापारी हे शहादा शहरात वास्तव्यास आहेत. शहादा तालुक्यातून पपई खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून एकतर्फी पद्धतीने ठरवले जातात. कारण त्याच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पपई पिकांचे रोप, औषध, रासायनिक खत घेण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना काही अ‍ॅडव्हास स्वरूपात रक्कम देतात व पपई उत्पादनाची मनमर्जी पद्धतीने खरेदी करतात. या सर्व मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाने नियम लागू केले आहेत; पण त्या सर्व नियमांची पायमल्ली करीत पपई व्यापारी बिनधास्त शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत, तसेच अनेक व्यापारी शेतकऱ्यांना जास्ती भावाचे किंवा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करून पळूनही जातात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळात अनेक वेळा वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन पपई व्यापाऱ्यांचे शासनमान्य कागदपत्र पूर्ण करून त्यांना परवाना दिला पाहिजे व ज्या व्यापाऱ्याकडे शासनमान्य परवाना असेल त्यालाच फक्त पपई खरेदी करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी. जिल्ह्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे काम होत आहे. कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, नियमावली नाही, कोणतीही कागदोपत्री शासन दरबारी नोंद नाही म्हणून कसे काम करायचे किंवा शेतकऱ्यांचा माल भरून पैसे न देता पळून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर बाजार समितीचे दरपत्रकानुसार खरेदी करण्याचे आवाहन करूनही परस्पर दर कमी करून पपई उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापारी करीत आहेत. व्यापार कोणीही कुठेही करू शकतो, त्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु आर्थिक व्यवहार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच झाले पाहिजेत. कारण हे परप्रांतीय व्यापारी आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा व्यवहार करीत आहेत; पण शासनाच्या तिजोरीत एकही रुपया जमा न करता कर चोरी करत आहेत. फळ खरेदी करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचे परवाने काढून त्यांची संपूर्ण माहिती द्यावी, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांचे पैसे काढून देण्यास मदत करावी व संबंधित व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करून शिक्षा करावी. पपई उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा करून २५ जानेवारीपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा २६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथू पाटील, कृष्णदास पाटील, वामन पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, ईश्वर चौधरी, महेंद्र पाटील, रत्नदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Loss of papaya growers due to arbitrariness of traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.