दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:34 IST2020-12-10T13:34:16+5:302020-12-10T13:34:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच गुजरात हद्दीतील शेत शिवारात अगदी दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या नर ...

दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच गुजरात हद्दीतील शेत शिवारात अगदी दिवसा ढवळ्या मुक्त संचार करणाऱ्या नर बिबट्यास बुधवारी शहराजवळील निंभोरा शिवारात गुजरात वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. ही वार्ता हद्दीतील गावांमध्ये कानोकानी हचल्यानंतर बघ्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान ही घटना व्यारा वनविभागास गावाकऱ्यांनी कळविल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यावर त्याची रवानगी गिरच्या जांगलात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार तळोदा शहराजवळील गुजरात हद्दीतील निभोरा परिसरातील शेत शिवारात गेल्या पाच, सहा दिवसापासून अगदी दिवसा ढवळ्या बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे शेतकऱ्यांना निदर्शनास आले होते. त्यामुळे मजूवर्गही बिबट्याच्या दहशतीमुळे कामाला येत नव्हते. साहजिकच शेतीची कामेही ठप्प झाली होती. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी निभोरा गावातील शेतकऱ्यांनी व्यारा वनविभागाकडे लेखी मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने निभोरा येथील शेतकरी विष्णू घुले यांचा कापसाच्या शेतालगत पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात ग्रामपंचायतीने बकरा ठेवला होता. हा बकरा खाण्यासाठी शेतात लपलेल्या बिबट्याने आत प्रवेश करताच तो पिंजऱ्यात अडकला. हा प्रकार त्या शेता शेजारी असलेले शेतकरी संजय श्रीपत घुले हे उसाचे पाणी बदलण्याकरिता शेतात जात असताना बिबट्या पिंजऱ्यात्त अडकल्याचे निदर्शनास आले. ही घटना त्याने शेतमालक विष्णू याना सांगितली तेव्हा त्यांनी व्यारा वनविभागाचे वन क्षेत्रपाल आकाश पाडसाला याना भ्रमणध्वनीने कळविले. संपूर्ण बंदोबस्तासह अधिकारी तेथे दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर जेरबंद बिबट्याला तेथून वाहनाद्वारे गिरच्या जंगलात नेण्यात आले आहे.
या वेळी परिसरात दहशत पसरवीत असलेला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती कानोकाणी गेल्यानंतर निभोरा परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच्या निःश्वास सोडला. तथापि अजूनही एक नर व मादी असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले
तळोदा वनविभागास देतोय गुंगारा
निभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्यानंतर पाच दिवसातच गुजरात वनविभागाने दखल घेत शेतात पिंजरा लावत बिबट्याचा बंदोबस्त केला. परंतु तळोदा परिसरात गेल्या चार, पाच महिन्यापासून बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घालत पाळीव प्राण्यान बरोबरच माणसाचा जीव घेतला आहे. तरीही वनविभाग ठोस कार्यवाही करायला तयार नाही. बिबट्या त्यांना गुंगाराच देत आहे. केवळ ट्रॅप कमेराच सोपस्कार पाडले जात आहे. गेल्या आठवड्यात राजकीय व्यक्तीस अनुभव आल्यानंतर आता कुठे वनविभागाने चिनोदा शिवारात पिंजरा लावला आहे. परंतु अजूनही तो पिंजऱ्यात आलेला नाही.