बदललेल्या राजकीय समिकरणात लागणार नेत्यांची कसोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:10 PM2019-12-12T12:10:48+5:302019-12-12T12:10:54+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभुमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत प्रचंड ...

Leaders test in changing political equations! | बदललेल्या राजकीय समिकरणात लागणार नेत्यांची कसोटी !

बदललेल्या राजकीय समिकरणात लागणार नेत्यांची कसोटी !

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभुमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत प्रचंड उत्सूकता आहे. चार महिन्यांपूर्वी ज्यांच्या सोबत राहून प्रचार केला आता त्यांच्या विरोधातच आता प्रचार करावा लागणार आहे. नेत्यांच्या या सोयीस्कर भुमिकांमुळे कार्यकर्तेही सैरभर झाले असल्याने या निवडणुकांचा निकाल चक्रावून टाकणारा राहील असेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
नंदुरबार तालुक्यात दहा गट व २० गण आहेत. यंदा तब्बल सहा गट हे ओबीसींसाठी राखीव आहेत. या सहाही गटांमध्ये प्रचंड चुरस राहणार आहे. जिल्ह्यातील दिग्गजांच्या ज्या लढती होतील त्यातल्या सर्वाधिक या नंदुरबार तालुक्यातील या सहा गटात राहणार आहे. त्यात काही नेत्यांची राजकीय कारकिर्द सुरू होणार आहे तर काहीजण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून आपले नशीब अजमावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उदासिनता असलेल्या या निवडणुकांमध्ये आता रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. गावागावात राजकीय आखाडे सुरू झाले आहेत अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
समिकरणे बदलली
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-सेना युती होती. त्यामुळे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकत्रीत प्रचार केला. या नेत्याचे मनोमिलन काहींच्या पचनी पडले नव्हते. परंतु या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला. आता काहीही झाले तरी ही वेल्डींग तुटणार नाही म्हणून आश्वासन दिले होते. रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांनीही एकदिलाने काम करून आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना एकतर्फी निवडून आणले होते. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींनी या दोन्ही नेत्यांचे वेल्डींग पुन्हा तुटल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. जेथे एकतर्फी निवडणुका झाल्या असत्या तेथे आता पुन्हा चुरस राहणार आहे. परिणामी सर्वच दहा गटांमधील लढती या उत्कंठावर्धक ठरणार आहेत.
दुसरीकडे शिवसेना अर्थात चंद्रकांत रघुवंशी यांचा गट सक्रीय झाला आहे. भाजपच आपला प्रमुख विरोधक राहणार असल्याचे सांगून महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तर काँग्रेसने सर्वच जागांवर उमेदवार देण्यासंदर्भात सुतोवाच केले आहे. राष्टÑवादीची भुमिका संदिग्धच म्हणावी लागणार आहे. त्यामुळे तालुक्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी गट विरुद्ध भाजप अशाच लढती राहणार असल्याची शक्यताही आहे.
कारकिर्दचा शुभारंभ
या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत तीन जणांचा राजकीय कारकिर्दचा शुभारंभ होणार आहे. त्यात युवा नेते व रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड.राम रघुवंशी, भाजपचे रवींद्र गिरासे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या परिवारातील सदस्य व आणखी काही जणांचा समावेश राहणार आहे.
बंडखोरींची शक्यता
एका एका जागेसाठी अनेकजण इच्छूक आहेत. काँग्रेस, भाजपच्या मुलाखतीच्या वेळी हे दिसून आले. शनिवारी शिवसेनेच्या मुलाखती आहेत. सर्वांनाच जिल्हा परिषद, पंचायत समितीत जाण्याची घाई झाली आहे. तर काहीजण केवळ दबाव तंत्रासाठी उमेदवारी जाहीर करीत आहेत. त्यामुळे दहा पैकी सहा गटात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा बडोबांना शांत करण्यासाठी नेत्यांची कसरत होणार आहे.
कोणता झेंडा घेवू हाती
चार महिन्यातच झालेल्या राजकीय बदलांमुळे अनेक गावातील कार्यकर्ते नाराज आहेत तर काही ठिकाणी वेल्डींग तुटल्याचा आनंद आहे. असे असले तरी उमेदवारी मिळविण्यासाठी कोणता झेंडा घेवू हाती अशी द्विधा आणि गोंधळाची स्थिती ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांची झाल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडी झाल्यास....
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादीने निवडणूक लढविल्यास भाजपला सरळ टक्कर देता येणार आहे. परिणामी सर्व विरोधक एकीकडे व भाजप एकीकडे असे चित्र राहणार आहे.

भाजपला सोयीस्कर ठरेल?
भाजपने तुर्तास स्वबळावर निवडणुका लढविण्याचे घोषीत केले आहे. सर्व पारखूनच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे कुणालाही सोबत न घेता लढण्याचा भाजपचा निर्णय कितपत योग्य ठरतो हे येणारा काळच ठरवेल.

पक्ष चिन्हावर लढणार किंवा कसे?
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी गट आतापर्यंत काँग्रेसच्या चिन्हावर लढला आहे. यावेळी प्रथमच आघाडी झाल्यास संयुक्त चिन्ह किंवा पक्षातर्फे लढल्यास सेनेच्या चिन्हावर लढावे लागणार आहे. त्यामुळे कसरत होईल.

समन्वय टिकवून ठेवावा लागेल...
आमदार डॉ.विजयकुमार गावीत व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना या निवडणुकीत समन्वय टिकवून ठेवावा लागणार आहे. सोयीचे राजकारण किंवा लढती होतील तेथे या दोन्ही नेत्यांचे एकमत महत्वाचे राहणार आहे.

अडीच वर्षानंतर पंचायत समितीत सत्तांतर...

गेल्या निवडणुकीत नंदुरबार पंचायत समितीत २० पैकी ११ जागा या राष्टÑवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षासाठी राष्टÑवादीच्या अर्चना गावीत या सभापतीपदी होत्या. अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले. राष्टÑवादीकडून काँग्रेसकडे सत्ता आली. रंजना नाईक या अध्यक्षा झाल्या. राष्टÑवादीचे दोन ते तीन सदस्य फुटले होते. आता देखील पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी रघुवंशी गट व गावीत गट प्रयत्नशील राहतील हे स्पष्टच आहे.

सात गटात राष्टÑवादी..
गेल्या निवडणुकीत दहा पैकी सात गटात राष्टÑवादीचे अर्थात गावीत गटाचे उमेदवार निवडून आले होते तर अवघ्या तीन गटात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. पं.स.मध्ये ११ जागा राष्टÑवादी तर ९ जागा काँग्रेसला होत्या.

Web Title: Leaders test in changing political equations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.