ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:18 IST2019-04-09T12:18:52+5:302019-04-09T12:18:57+5:30

जिल्हा प्रशासनासह गाव एकवटले : दुष्काळाचा अंध:कार दूर करण्यासाठी कोठली ग्रामस्थ सज्ज

Le mashale has come and people are in my village .. | ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के..

ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के..

नंदुरबार : ‘ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीतलेंगे लोग मेरे गांव के..’ हिंदीचे प्रख्यात कवी बल्लीसिंह चिमा यांच्या या प्रेरणा गीतातील बोलीचा प्रत्यय कोठली, ता.नंदुरबार येथे ग्रामस्थांच्या कृतीतून पहायला मिळाले. निमित्त होते दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या शुभारंभाचे.
जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी गेल्या काही वर्षापासून खोल जात असल्याने अनेक गावात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोक अक्षरश: पेटून उठले आहेत. पाणी फाऊंडेशनतर्फे गेल्या वर्षापासून वॉटरकप स्पर्धा सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक गावे श्रमदानातून व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबवून दुष्काळावर मात करण्याचा प्रय} करीत आहे. या वर्षी देखील या स्पर्धेला सोमवार दि.8 एप्रिलपासून सुरूवात झाली. त्यासाठी जिल्हाभरातील जवळपास 40 पेक्षा अधिक गावांनी मध्यरात्रीच श्रमदानाला सुरूवात करून कामाचा शुभारंभ केला आहे.
याच पाश्र्वभूमीवर रविवारची मध्यरात्र कोठली, ता.नंदुरबार येथील ग्रामस्थांसाठी एक आगळी आणि चैतन्यदायी ठरली. याठिकाणी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे, अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले, तालुका समन्वयक सूरज शिंदे, कथाकार जिज्ञासा दिदि, ग्रामविकास अधिकारी आर.डी. पवार, कोठलीचे जलमित्र व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कार्याचा शुभारंभ झाला. यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेचे आवार आबालवृद्ध व महिलांनी गच्च भरले होते. सारे गाव एकवटले होते. याचठिकाणाहून दुष्काळमुक्तीचा संकल्प करीत मशाल पेटवून संपूर्ण गावात मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीने गावक:यांमध्ये एक अनोखे चैतन्य भरले. गावातील प्रत्येक गल्लीबोळातून ही रॅली निघाली. गावालगतच असलेल्या एका शेतशिवारात त्याचा समारोप झाला. तेथे दुष्काळरूपी प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले आणि मध्यरात्री बरोबर 12 वाजून एक मिनीटांनी श्रमदानाला सुरूवात झाली. जवळपास  दोन हजारापेक्षा अधिक ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले. पहाटे अडीचर्पयत या सर्वानी श्रमदान केले. 
तब्बल सहा तास चाललेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या चेह:यावर जबरदस्त आत्मविश्वास व उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि त्याला हरविण्याची एक अनोखी जिद्द ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाली. गावातील जलमित्र दीपक पाटील, सागर पटेल, विलास पटेल, डॉ.शिरीष पाटील, प्रल्हाद पाटील, बलराम पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, कुंदन पाटील, रामेश्वर पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, मनीष पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, दुर्गा पाटील, दत्तात्रय पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.
 

Web Title: Le mashale has come and people are in my village ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.