कुपोषित बालकांची सेवा देणारे कुलकर्णी दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:59 AM2020-07-01T11:59:09+5:302020-07-01T11:59:16+5:30

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात गेल्या ४२ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ.शशांक कुलकर्णी व डॉ.अलका ...

Kulkarni couple serving malnourished children | कुपोषित बालकांची सेवा देणारे कुलकर्णी दाम्पत्य

कुपोषित बालकांची सेवा देणारे कुलकर्णी दाम्पत्य

Next

सुनील सोमवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात गेल्या ४२ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ.शशांक कुलकर्णी व डॉ.अलका कुलकर्णी यांची कुपोषित बालकांसंदर्भातील सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे असून या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.
डॉ.शशांक कुलकर्णी यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यासाठी आदर्श प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यमातून डॉ.कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ.अलका कुलकर्णी हे दाम्पत्य कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबवत आहे. या कार्यात त्यांना मुंबईच्या आय.आय.टी. व शबरी सेवा समिती या संस्थांची मदत मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात बालकुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने अशा कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करुन त्यांना स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतात. या बालकांच्या उपचारासाठी १२ खाटांचा स्वतंत्र कक्ष आहे. गेल्या १० वर्षापासून हा उपक्रम सुरु असून शेकडो बालकांवर येथे मोफत उपचार करण्यात आले आहेत. सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना संस्थेतर्फे मोफत औषधी, खेळणी व सकस आहाराचे वाटप करण्यात येते. सर्व रुग्णांच्या रक्त व लघवी तपासण्या, एक्स-रे व गरज भासल्यास टू डी एको, रक्त, लघवीची तपासणी, सी.टी. स्कॅन, रक्तपुरवठाही केला मोफत जातो. दवाखान्यातून सुटी झाल्यावरही सोया दूध पावडर व सुमारे महिनाभर पुरेल एवढा आहार पालकांना सोबत दिला जातो. शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता या संस्थेतर्फे आतापर्यंत जिल्ह्यात ४१ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली असुून या शिबिरातून हजारो रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.
कुपोषण निर्मूलनाबरोबरच इतर वैद्यकीय सेवाही गरीब रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देतात. २०१२ मध्ये हर्निया झालेल्या रुग्णांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात ६० तर २०१३ मध्ये ४४ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इंग्लंड येथील डॉ.अँन्ड्रयू किंग, जर्मनीचे डॉ. हॅन्स लायरल आणि अमेरिकेचे डॉ.अर्ल डेव्हीड व डॉ.सी. कार्बर यांनी शहाद्यात येऊन हर्निया शिबिरात रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पुत्र डॉ.दर्शन कुलकर्णी व स्नुषा डॉ.मालविका कुलकर्णी ह्या सहकार्य करतात.
डॉ.शशांक कुलकर्णी यांना सामाजिक कार्याची व नाट्य क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या अनेक नाटकातून अभिनय केला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ते माजी जिल्हाध्यक्ष असून ग्रामीण भागात असलेल्या अंधश्रध्दा मिटवण्यासाठीही त्यांनी अनेक उपक्रम अंनिसच्या माध्यमातून राबविले आहेत. अंधश्रध्दा मिटविण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचेही त्यांनी आयोजन केले आहे.

Web Title: Kulkarni couple serving malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.