लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : येथील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज जिल्हा प्रशासनाने या पोल्ट्रीतील चार लाख कुक्कुट पक्षी नष्ट करण्यास आजपासून सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपासून पिंपळनेर चौफुलीवरील डायमंड पोल्ट्रीत प्रशासनाने जलदगतीने कोंबड्यांच्या किलिंगचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी येत्या चार दिवसांत दीड लाख कोंबड्यांचे किलिंग केला जाणार आहे, तर अन्य पोल्ट्री फार्मवर निगराणी ठेवली जाणार आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मच्या कोंबडीचे नमुने हे बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी दिली.
या ठिकाणी नाशिक, नगर ,जळगाव,धुळे अशा उत्तर महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. १०० पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी किलिंग चर काम केले जात आहे. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे.
नवापूर तालुक्यातील चार पोल्ट्री फार्मचे बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तब्बल पंधरा वर्षांनी नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मागच्या आठवड्यात नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममध्ये प्रमाणापेक्षा अधिक कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने जवळपास चार पोल्ट्री फार्ममधील अहवाल तपासणीसाठी पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्याने याठिकाणी बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने चार पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोबड्यांची कत्तल करून प्रशासनाच्या वतीने सुरुवात झाली आहे. तर या फार्मच्या परिसरातील १२ अन्य पोल्ट्री फार्ममधील जवळपास चार लाख कोंबड्यादेखील धोकादायक क्षेत्रात समावेश झाला आहे. एकट्या नवापूर तालुक्यात २८ पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास साडेनऊ लाख कुक्कुटपक्षी आहेत. या निर्णयाने कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मात्र करोडो रुपयांचे नुकसान होणार असून २००६ च्या बर्ड फ्लूनंतर जेमतेम उभारी घेत असलेला हा व्यवसाय पुन्हा डबघाईला जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर तालुक्यातील अंडी, कोंबडी, मांस विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. तर नवापूर तालुक्यात कोबड्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसांत पशुसंवर्धन विभागाचे जवळपास शंभर पथके नंदुरबारमध्ये दाखल झाले असून उर्वरित २२ पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे अहवालदेखील पाठवून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किलिंग ऑपरेशनला सुरुवात करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.
ग्रामीण भागात दवंडी
नवापूर तालुक्यातील कुक्कुट पक्ष्यासोबत देशी कोंबड्या, बदके व इतर पक्षी यांना बर्ड फ्लूची लागण होण्याची संभावना लक्षात घेता सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दवंडी देऊन आपल्या घरी, शेतात,पाळलेल्या सर्व कोंबड्या, बदके व इतर पक्षी यांनाही सदर रोगाची लागण झाल्याची तीव्र संभावना लक्षात घेता व त्यापासून ग्रामस्थांना बर्ड फ्लू रोगाची लागण होवू नये. यासाठी आपणाकडील सर्व पाळीव व जिवंत कोंबड्या, कबुतर, बदके, इतर पक्षी शासनाच्या वाहनात ट्रॅक्टरमध्ये तात्काळ जमा करावेत. त्यासाठी शासनामार्फत आज, उद्या ट्रॅक्टर, पीकअप वाहन आपल्या गावात पाठविण्यात येणार आहे. पक्षी जमा करताना सोबत ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी त्यांचे बँक पासबूक, आधारकार्ड सोबत आणण्यासाठी सांगितले आहे. पाळीव पक्षी शासकीय वाहनावरील कर्मचाऱ्यांकडे द्यावी. कोणीही यामध्ये टाळाटाळ करु नये. केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ नुसार, तसेच प्राणी संक्रमण व नियंत्रण, प्रतिबंध करणे २००९ नुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक...
नवापूर, पिंपळनेर, चौफुली नजीक असलेल्या डायमंड पोल्ट्रीमध्ये साधारण २०० पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत २१ हजार कुक्कुट पक्ष्यांना नष्ट केले आहे. त्याआधी सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई कीट परिधान करून सर्वांना टॉमी फ्लूचे औषध देऊन पोल्ट्रीमधील शेडमध्ये पक्षी नष्ट करण्यासाठी पथके रवाना केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुट पक्ष्यांना जेसीबीच्या साह्याने खड्डा करून त्यात चुना निर्जंतुकीकरण औषध टाकून पुरविण्यात आले आहे. सर्वात आधी डायमंड पोल्ट्रीमधील कोंबड्यांना पाण्यात बेशुद्धीचे औषध टाकले. त्यानंतर कुक्कुट पक्ष्यांना किलिंग करण्याची प्रक्रिया राबविण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पक्षी शास्रीय पद्धतीने कत्तल करणाऱ्या पथकांना औषधे, पीपीई कीट, मास्क तसेच आवश्यक साहित्य तत्काळ देण्यात यावे. त्यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक करावी. नियंत्रण कक्षाची तातडीने सुरुवात करण्यात यावी. बाहेरून कुक्कुट पक्षी शहरात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाने परिसरात बर्ड फ्लूबाबत जनजागृती करावी. पोल्ट्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक त्या कालावधीसाठी विलगीकरणात ठेवण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.
दक्षिण गुजरातसह खान्देशात केला जातोय येथील चिकन व अंडीचा पुरवठा
सकाळी १० वाजेच्या सुमारास पिंपळनेर चौफुलीजवळील डायमंड पोल्ट्री ४० हजार पक्षी मारण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील २०० कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांनी पोल्ट्रीचा पंचनामा करण्यासाठी पाठविण्यात आले होते.
तालुक्यातील २००६ साली झालेल्या बर्ड फ्लूची तीव्रता अधिक होती. त्या तुलनेने २०२१ मध्ये बर्ड फ्लू आजाराची तीव्रता कमी दिसून आली.
तालुक्यातील २८ पोल्ट्रीमधील कोंबड्या अंडी सर्वाधिक गुजरात राज्यातील सुरत, नवसारी, व्यारा, बारडोली, वापी दमण या भागात जात होते तसेच महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या परिसरामध्ये पक्षी, अंडी विक्री केली जाते.
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय महाराष्ट्रातील खानदेश व गुजरात राज्यातील दक्षिण गुजरात साठी बिजनेस हब ठरला आहे.