लग्न सोहळ्यासाठी पोलिसांना कळवा अन्यथा कारवाईचा आहेर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:02+5:302021-02-24T04:33:02+5:30
रेस्टॉरंट, शाळा, उद्याने, धार्मिक स्थळे, इतर ठिकाणीदेखील गर्दी होऊ न देणे व शारीरिक अंतराच्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील ...

लग्न सोहळ्यासाठी पोलिसांना कळवा अन्यथा कारवाईचा आहेर घ्या
रेस्टॉरंट, शाळा, उद्याने, धार्मिक स्थळे, इतर ठिकाणीदेखील गर्दी होऊ न देणे व शारीरिक अंतराच्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत यांनी त्यांच्या अखत्यारितील दुकाने व इतर आस्थापना यांचे दर्शनी भागात ‘विना मास्क प्रवेश बंदी’ या प्रकारचे फलक लावण्याबाबत सूचना द्याव्यात. कोविड-१९ च्या नियमांबाबत जनजागृती करण्यात यावी. बाजाराच्या ठिकाणी जागा निश्चित करून दोन दुकानांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात यावेत. बाजारात गर्दी होणार नाही, याचे नियोजन करावे. सर्व मेडिकल, भाजीपाला, दूध, किराणा, दुकानदार व पेपर विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. ज्या प्रभागात, वाॅर्डात कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास त्याठिकाणी स्वॅब घेण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन ठेवत कोरोना चाचणी करावी. लग्न समारंभ, इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी, सिनेमा हॉल, रेस्टाॅरंट, क्लब, नाईट क्लब इत्यादी आस्थापनांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक अथवा व्यक्ती असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान विना मास्क आढळल्यास प्रथम २०० रुपये, दुसऱ्यांदा ४०० तर तिसऱ्यांदा ४०० रुपये दंड व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग न केल्यास ग्राहक व विक्रेत्यांना प्रथम २०० रुपये, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानात क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक असल्यास संबंधितास प्रथम १० हजार दंड व नोटीस देण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास १ महिन्याकरिता आस्थापना सील करण्यात येईल व संबंधित मालक व आयोजक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. व्यायामशाळा, मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल किंवा घरगुती समारंभाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रथम १० हजार रुपये दंड व नोटीस देण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास एक महिन्याकरिता आस्थापना सील करण्यात येईल व संबंधित मालक व आयोजक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
नियमांचे उल्लंघनप्रकरणी होणाऱ्या कारवाईसाठी महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाला अधिकार देण्यात आले आहे. आदेशानुसार एसटी महामंडळाने बस स्थानकात बैठे पथक स्थापन करावे, प्रवाशाकडून कोविड-१९ च्या अनुषंगाने पारित केलेले आदेश सूचनाचे पालन होत असल्याबाबत खात्री करावी. प्रवासी वाहतूक करताना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करावी. बस स्टॅन्डच्या ठिकाणी दर्शनी भागात फलक व जिंगल्सद्वारे कोविड जनजागृती करावी. कोरोनाविषयक नियमांचे पालन न झाल्यास दंड आकारणी करावी. व्यवस्थापक, आगार प्रमुख यांना गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ठिकठिकाणी बैठे पथक स्थापन करावे. खासगी प्रवासी वाहतुकीची तपासणी करावी. नियमबाह्य असल्यास दंडाची आकारणी करावी. रेल्वे स्थानकात पथक स्थापन करून नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे.
शासकीय कार्यालय परिसरात विनामास्क बंदी करावी, कार्यालयात शारीरिक अंतराचे काटेकोर पालन करावे, तसेच कोविड-१९ बाबत शासनाने वेळोवेळी आदेशित केलेल्या नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यासाठी कार्यालय प्रमुखांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर साथ प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आला आहे.