भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:49 IST2025-04-29T16:49:27+5:302025-04-29T16:49:47+5:30

अपघातात चार घरांचे नुकसान झालं असून दोन वाहनांनाही धडक बसली आहे.

Horrific accident A speeding container crashed directly into houses one killed one injured | भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी

भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी

नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार घरांना धडक दिली. एकाला १०० फूट फरफटत नेल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला, तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय टेम्पो व दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

संजय भिका ठाकरे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून, धनाबाई माळी या गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा - खेतीया रस्त्यावरील ब्राह्मणपुरी गावात खेतीयाकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र. डीडी ०१ पी ९७३५) रस्त्याचा कडेला असलेल्या भाईदास नेवरे यांच्या घरातील पत्र्याचा शेडसह संजय भिका ठाकरे, विजय माळी, मोहन काळू मराठे, कमलेश तावडे यांच्या घराला धडक दिली. यात घराच्या ओट्यावर झोपलेले संजय भिका ठाकरे यांचा चिरडून मृत्यू झाला, तर धनाबाई माळी या वृद्धेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने कुटुंबातील इतर सदस्य सुखरूप बचावले.

अपूर्ण रस्ता काम आणखी किती बळी घेणार...
ब्राम्हणपुरी गावातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या ११ महिन्यांपासून ब्रेक लागला आहे. खोदून ठेवलेले खड्डे त्याचबरोबर गतिरोधक तसेच रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहे.
यामुळे रस्त्याचे अपूर्ण काम नागरिकांच्या जीवावर उठले असून आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चालक बहादूर रतन डवर रा. गंधवानी, जि. धार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार युवराज पाटील करीत आहे.
 
घराच्या भिंती, पत्रे, घरातील साहित्य व दोन्ही वाहनांचे पार्ट रस्त्यावर विखुरले..
अपघात एवढा भीषण होता की, घरांच्या भिंती, मयत संजय ठाकरे हे झोपलेली खाट, घराचे पत्रे, झाडाच्या फांद्या, विटांचा खच, मोटारसायकल, कमलेश तावडे यांचा टेम्पो भररस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. त्याचा पाठलाग करत नागरिकांनी खेतीया येथील नागरिकांचा मदतीने ट्रकचालकास पकडले. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नीलेश देसले, उपनिरीक्षक भूपेंद्र मराठे यांच्यासह म्हसावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ब्राह्मणपुरीचे पोलिसपाटील रवींद्र पवार, प्रवीण  पाटील, नंदकिशोर सोनार, अनिल थोबी, मनोहर सोनार, अर्जुन राजपूत, सुनील गिरासे, भगवान मराठे आदी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. अपघातात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून बाहेर उभे असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Horrific accident A speeding container crashed directly into houses one killed one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात