He choked the girl in his sleep out of one-sided love | एकर्फी प्रेमातून झोपेतच त्याने मुलीचा चिरला गळा

एकर्फी प्रेमातून झोपेतच त्याने मुलीचा चिरला गळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा :  घरासमोर असलेल्या मुलीवर एकतर्फी प्रेम, प्रेमाला मुलीचा वडिलांचा आणि नंतर मुलीचाही विरोध, यामुळे बिथरलेल्या युवकाने मुलीलाच संपविण्याचा बेत आखला आणि तो तडीस देखील नेला. सकाळी मुलगी अंगणातील ज्या खाटेवर झोपली होती ती खाट रिकामी, जवळच रक्ताचे थारोळे साचलेले. त्यामुळे मुलीचा शोधाशोध सुरू झाला. विविध तर्क वितर्क लावले जाऊ लागले. अखेर घरापासून २०० मिटर अंतरावरील शेतात गोणपाटात मुलीचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. 
रावेर येथील चार अल्पवयीन बालकांचे खून प्रकरण ताजेच असतांना ही घटना घडली आणि पोलिसांनी गांभिर्याने घेत अवघ्या १२ तासात खुनाचा छडा लावून युवकाला ताब्यात घेतले.  
सारंगखेडा येथील भूत बंगला परिसरातील वस्तीत ही थरारक घटना २३ रोजी पहाटे घडली. या परिसरात राहणारा किशोर शिवदास वडर (२५) याचे त्याच्याच घरासमोरील दहावीत शिकणाऱ्या मुुलीशी एकतर्फी प्रेमसंबध होते. त्याला मुलीच्या घरच्या लोकांचा विरोध होता. मुलीच्या वडिलांनी त्याला समजवून सांगितले होते. मुुलीनेही विरोध केला होता. त्यामुळे किशोर याच्या मनात राग होता. 
शुक्रवार, २३ रोजी पहाटे १ ते सहा वाजेच्या दरम्यान त्याने आपल्या मनातील राग मुलीचा खून करून   शांत केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या घराच्या अंगणात खाटेवर झोपली होती. मध्यरात्रीनंतरच्या निरव शांततेत    त्याने मुलीचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका गोणपाटात टाकून तो घरापासून २०० मिटर अंतरावरील शरद बाबुलाल पाटील यांच्या शेतात फेकून दिला.
सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर तपासाला दिशा दिली. संशयीत किशोरवर संशयाची सूई स्थिरावली. त्याला ताब्यात घेतले. परंतु सुरुवातीला त्याने थारा लागू दिला नाही. नंतर पोलीसी हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. श्वान पथक, फॅारेन्सीक एक्सपर्ट, ठसे तज्ज्ञ यांचीही मदत मिळाली. 
सायंकाळी उशीरा संतोष बिजलाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून किशोर शिवदास वडर याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. असून आरोपीतास अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास शहादा उपविभागीय अधिकारी करीत आहेत. आणि संशयीत आला जाळ्यात...
सकाळी मुलगी जागेवर नाही, खाटेजवळ खाली जमीनीवर रक्ताचे थारोळे साचलेेले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली येथे काहीतरी रक्त टाकून मुलीला कुणीतरी पळवून नेल्याचीही चर्चा सुरू झाली. पोलीस ठाण्यावर नातेवाईकांची गर्दी झाली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, त्याचबरोबर श्वान  पथकाचे पोलिस उपनिरीक्षक डांगरे, फॉरेन्सिक टीम चे पथक घटनास्थळी दाखल  झाले.

Web Title: He choked the girl in his sleep out of one-sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.