अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:40+5:302021-02-23T04:48:40+5:30

शासनाने राज्यात गुटका उत्पादन व विक्रीवर बंदी घातलेली असताना गुटख्याची तस्करी सुरू आहे, म्हणून गुटखा तस्करांचे मोठे जाळे सर्वत्र ...

The Food and Drug Administration needs to pay attention to this | अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज

अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज

शासनाने राज्यात गुटका उत्पादन व विक्रीवर बंदी घातलेली असताना गुटख्याची तस्करी सुरू आहे, म्हणून गुटखा तस्करांचे मोठे जाळे सर्वत्र पसरले आहे. शहरात खुलेआम पुड्यांची विक्री व वाहतूक केली जाते. अनेक ठिकाणी अवैध मार्गाने गोदामात लाखो रुपयांचा माल साठवून ठेवण्यात आला आहे. शहरातील किराणा दुकानदार व पानटपरी चालकांकडून गुटकाविक्रीची सूत्र हलविली जातात. मध्यंतरीच्या कालावधीत गुटका तस्करातील आपसातील हेवेदावे निर्माण झाल्याने आरोपीसाह माल पकडून देण्यात आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी माल वाहतूक होताना गाडीसह लाखो रुपयांचा माल पकडून गुन्हा दाखल केला आहे. अनेकदा अशी कार्यवाही करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. नागरिकांनी छुप्यामार्गाने जाणारी गुटका पुडी दुचाकीवरून वाहतूक करताना पकडली आहे, असा सावळा गोंधळ शहर व तालुक्यात सुरू आहे.

घातक पुडीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले असून, पोलीस व अन्न भेसळ अधिकारी यांच्याशी शहरातील तस्कराचे अर्थपूर्ण संबंध झाल्याने सदरील व्यापाऱ्यावर नाममात्र कार्यवाही करून मोकळे सोडले जाते. घातक पुडीमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. नवयुवक या व्यसनात चक्क गुरफटून गेल्याने पालकात भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित अधिकारीही यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस निर्णय घेत नाहीत. शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे. सदरील तस्करांना अभय कुणाचे मिळते आहे, हे मात्र कळायला तयार नाही.

गेल्या वर्षभराच्या कालावधीत शहादा तालुक्यातील शहादा, म्हसावद व सारंगखेडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान १० गुटका तस्करीच्या कारवाया केल्या. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला. मात्र केवळ वाहनचालक व गाडीतील त्याचा साथीदार अशा दोघांना याप्रकरणी पोलिसांनी आरोपी केले आहे. विशेष म्हणजे संबंधित वाहन चालकाने कोणाच्या सांगण्यावरून व कुठून हा गुटखा आणला याचा तपास लावणे पोलिसांना सहजरीत्या शक्य असतानाही पोलीस तपासात या कारवायांमध्ये आरोपींची संख्या वाढलेली नाही. परिणामी गुटका विक्रेता, तस्कर व त्यांचे इतर साथीदार पोलीस कारवाईपासून लांबच राहिले. यामुळे तस्करांवर कायद्याचा धाक नसल्याने गुटख्याची तस्करी व विक्री खुलेआमपणे तालुक्यात होत आहे.

राज्यात गुटख्याची विक्री व वाहतुकीची बंदी असली तरी शहादा तालुका हा गुजरात व मध्य प्रदेश या दोन राज्यांना सीमावर्ती भागात असल्याने या दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करून शहर व तालुक्यात त्याची विक्री केली जात आहे. मुळात संबंधित विभागाने गुटका वाहतूक व विक्री होत असताना पकडल्यानंतर या मागील मुख्य सूत्रधारांना जेरबंद करणे पोलिसांना सहज शक्य आहे. परंतु पोलीस प्रशासनातर्फे या मुख्य सूत्रधारांचा शोध प्रामाणिकपणे घेतला जात नसल्याने तस्करांमार्फत खुलेआमपणे गुटख्याची तस्करी सुरू आहे. पोलीस प्रशासन व अन्न प्रशासन विभागाकडे गुटख्याची विक्री व वाहतूक तसेच तस्करीप्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार असल्याने या दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तस्करांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे. मध्यंतरी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील गुटखा तस्करीबाबत तक्रारी केल्या. मात्र त्यानंतर तस्करी बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस फोफावत असल्याने या गुटखा तस्करांवर अभय व आशीर्वाद कोणाचा याचा शोध आता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.

Web Title: The Food and Drug Administration needs to pay attention to this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.