अखेर पशुसंवर्धन विभागाचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:08+5:302021-08-24T04:35:08+5:30
नवापूर : तालुक्यातील अनेक भागात गुरांवर लिम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ...

अखेर पशुसंवर्धन विभागाचे पथक दाखल
नवापूर : तालुक्यातील अनेक भागात गुरांवर लिम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच लागलीच सोमवारी पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने प्रादुर्भाव असलेल्या गावी जाऊन तपासणी केली.
नवापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरांवरील लिम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पावसाळ्यापूर्वी लसीकरण न झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. या आजारामुळे पशुपालकही हैराण झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने सोमवार, २३ ऑगस्टच्या अंकात शेतकऱ्यांची व्यथा असलेले वृत्त प्रसिद्ध करताच लागलीच पशुसंवर्धन विभागाचे पथक त्या त्या गावांमध्ये दाखल झाले. पथकांनी गुरांची तपासणी केली. विशेषत: बैलांमध्ये या आजाराची लागण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. तपासणी केल्यानंतर हा आजार प्राथमिक स्तरावर असला तरी त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कृषी विभागातर्फे दक्षता घेतली जात आहे. पशुंचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
पथकात पशुसंवर्धन उपायुक्त डॅा.मनोज पावरा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश पाटील, सहायक आयुक्त डॉ.सागर परदेशी, डॅा.अशोक वळवी, योगेश गावीत, ए.पी.वळवी, ए.आर.पाटील आदींचा समावेश होता.