कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांचा पीक बदलीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:31 AM2021-05-07T04:31:42+5:302021-05-07T04:31:42+5:30

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ...

Farmers in the area, including Kalambu, tend to shift their crops | कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांचा पीक बदलीकडे कल

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांचा पीक बदलीकडे कल

Next

कळंबूसह परिसरात यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले आहे. पिकांच्या बदलांनुसार व शेतजमिनीवर आधारित कमीत कमी एकरी ४० टन, उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे. कमी भांडवल व अल्प मेहनतीने मिळणाऱ्या उत्पादनात समाधानी होणार असल्याचे ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ऊस लागवडीसह भाजीपाला लागवडीवर सध्या कळंबू परिसरातील शेतकऱ्यांचा ओढ दिसून येत आहे. दरवर्षी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, आदी पिके घेतली जात होती; परंतु इतर पिकांचा वाढता खर्च आणि मजूर वर्गाअभावी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे प्राधान्य दिले आहे. यावर्षी थोड्या फार प्रमाणात का होईना; परंतु उन्हाळा पास होईल एवढ्या प्रमाणात पाणी साठा काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी प्राधान्य दिले.

मजूर वर्गाअभावी ऊस लागवडीचा निर्णय

कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच मजूर टंचाईला सामोरे जावे लागते. भटकंती करूनही वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला होता. एकीकडे मजुराअभावी भटकंती तर मालास हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत होता. म्हणूनच यावर्षी बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीस प्राधान्य दिले. तर परिसरातील शंभर टक्के जमीन ओलिताखाली आली असती.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसासिंचन योजनांना पुनजीर्वित करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत सुमारे ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून काही प्रमाणात दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली होती. यासाठी लागणारी साधन सामग्री गेल्या वर्षाभरापासून बेवारस स्थितीत पडली आहे. काम मार्गी लागावे यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी संबंधिताकडे वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करत जलसमाधी घेण्याचाही इशारा दिला होता. मात्र, धुळे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयात विभागीय पथकाच्या उपस्थित बैठक घेत रखडलेले काम पूर्णत्वास नेऊन लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देत संबंधित शेतकऱ्यांना अभियंता यांनी विनंती केल्याने शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनास स्थगिती दिली होती. मात्र, काही महिने उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. आतापर्यंत जर सिंचन योजना पूर्णत्वास येऊन याचा लाभ शेतकऱ्यांना झाला असता व परिसरातील जमीन सुजलाम, सुफलाम होऊन, सिंचन क्षेत्रातील पूर्ण जमीन ओलिताखाली आली असती आणि शेतकरी सुखी झाला असता.

सहा एकर क्षेत्रात बोअरवेलच्या आधारे यावर्षी ऊस लागवड केली असून बोअरवेल ७०० ते ८०० फुटांवर सद्य:स्थितीत सुरळीत चालू आहे. भविष्यात बोअरवेल कधीही बंद पडू शकतो व ऐनवेळेस उसाला पाण्याची कमतरता भासू शकते, सद्य:स्थितीत उपसासिंचन योजना कार्यन्वित झाली असती तर परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असते.

-ऋषिकेश बोरसे, ऊस लागवड शेतकरी, कळंबू, ता. शहादा

Web Title: Farmers in the area, including Kalambu, tend to shift their crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.