२४ बाय ७ योजनेला मूर्त स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:08 IST2020-02-03T12:08:24+5:302020-02-03T12:08:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प यंदा पुर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे राबविण्यात येणारी ...

२४ बाय ७ योजनेला मूर्त स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक प्रकल्प यंदा पुर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे राबविण्यात येणारी २४ बाय ७ या महत्वाकांक्षी पाणी योजनेला मूर्त रूप येण्याची शक्यता यंदा आहे. एका खाजगी संस्थेकडून सर्व्हे करून योजनेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे.
नंदुरबार शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी ुपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्य स्थितीनुसार २०४० सालापर्यंत वाढणारा विस्तार आणि लोकसंख्या या दृष्टीने पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. यापुढील टप्पा हा शहरवासीयांना दिवसभर पाणी पुरवठा होऊ शकेल अशी आहे. त्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु पाणी पुरवठा करणारे विरचक प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरत नसल्याने ही योजना दोन वर्षांपासून थंड बस्त्यात होती. आता तिला मूर्त स्वरूप मिळाले आहे.
सद्य स्थितीतील पाणीपुरवठा
शहराची पाणी पुरवठ्याची स्थिती पहाता यंदा विरचक प्रकल्पात मुबलक पाणी आहे. त्यामुळे यंदा पाण्याची अडचण येणार नाही हे स्पष्ट आहे. शहरात सध्या झोननिहाय एक दिवसाआड व ४५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. पालिकेच्या नियोजनानुसार सर्व भागात मुबलक पाणीपुरवठा होईल अशी सोय करण्यात आली आहे. शिवाय सर्व भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केला जात असतो. उंच आणि चढावाच्या भागात काही समस्या असली तरी अशा भागातही उपाययोजना केल्या जात आहेत. झोननुसार पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले असून मुख्य पाणी स्त्रोत हा विरचक प्रकल्पातून आणि उर्वरित आंबेबारा प्रकल्पातून अर्थात आष्टे पंपींग स्टेशनवरून केला जातो.
कशी असेल योजना
या योजनेअंतर्गत पालिकेतर्फे नळजोडणी घेतलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी मात्र नळांना मिटर लावले जाणार आहे. मिटर लावले म्हणजे पाणी दर वाढतील असाही समज केला जात आहे. परंतु राज्यातील काही शहरांमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या योजनेनुसार जेवढे पाणी वापराल तेवढे बील अर्थात आता वर्षाला जेवढी पाणी पट्टी भरली जाते त्यापेक्षा कमी पाणी दर आकारणी होणार असल्याचा दावा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.
या योजनेसाठी सद्य स्थितीत असलेले झोन आणखी लहान करावे लागणार आहे. शिवाय स्टोरेज अर्थात पाणी साठवण क्षमता देखील काही प्रमाणात वाढवावी लागणार आहे. खाजगी संस्थेने केलेल्या सर्व्हेत या बाबी स्पष्ट करण्यात आल्या असल्याचे समजते.
पाणी काटकसरची सवय
या योजनेमुळे शहरवासीयांना पाणी काटकसरची सवय लागणार आहे. सध्या एक दिवसाआड आणि पुरेसा पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाणी वाया घालण्याचा प्रकार वाढला आहे. शिवाय एका घराची पाणी पट्टी भरून त्याद्वारे भाडेकरू ठेवलेल्या तीन चार कुटूंबांनाही पाणी मिळविले जाते. यामुळे पाणी काटकसर आणि अतिरिक्त पाणी वापराची सवय व प्रकार बंद होणार आहे. यामुळे मात्र काही शहरवासीयांच्या नाराजीलाही पालिकेला सामोरे जावे लागणार आहे.
नंदुरबारातील नळ जोडणीधारकांची संख्या जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधीक आहे. या नळजोडणीधारकांना झराळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज किमान ८० लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी पालिकेने शहराच्या चारही बाजूंना जवळपास १५ जलकुंभाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जाते. शहरात सर्वात जुनी पाण्याची टाकी ही साक्रीनाका परिसरातील आहे. याशिवाय टिळक विद्यालयामागे, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ, माळीवाडा, धुळेनाका, बुस्टरपंप, नवनाथ टेकडी, शांतीनगर, योगेश्वरनगर, नागाईनगर, देवमोगरा कॉलनी, परदेशीपुरा टेकडी, विरलविहार, हाटदरवाजा आदी ठिकाणी जलकुंभ आहेत. याशिवाय कलामंदीर आणि रंगारी विहिरीच्या कुपनलिकेतून अग्निशमनबंब, टँकर भरले जातात.