सातपुड्याच्या कुशीतील ‘त्या’ एकलव्यांना मिळाले गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:09 PM2020-10-16T13:09:52+5:302020-10-16T13:09:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने तिघा मित्रांनी धडगाव परिसरातील ७० खेळाडूंना एकत्रित करीत ‘नवी ...

Eklavya from Satpuda's Kushi got Guru | सातपुड्याच्या कुशीतील ‘त्या’ एकलव्यांना मिळाले गुरू

सातपुड्याच्या कुशीतील ‘त्या’ एकलव्यांना मिळाले गुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने तिघा मित्रांनी धडगाव परिसरातील ७० खेळाडूंना एकत्रित करीत ‘नवी उमेद नंदुरबार सातपुडा’ म्हणत उपलब्ध संसाधनांचा वापर करीत मैदानी खेळ व कसरतींचा सराव घेत आहेत. यातून भविष्यातील एखादा गुणी ऑलंम्पिक खेळाडू सातपुड्याच्या कुशीतून तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा क्रीडा विभागाने अशा खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहण्याची आवश्यकता आहे.
लॉकडाऊनमध्ये व्यक्तीगत व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक नवे  प्रयोग, प्रयत्न  समोर आले आहेत. असाच एक उमेद देणारा प्रयत्न सुरू  आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये. धनाजे बुद्रुक व तलावडी या गावात तीन अवलिया तब्बल ७० विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. धडगाव तालुक्यात राहणाऱ्या ॲड.छोटू वळवी यांना ही  कल्पना सूचली. त्यांनी ही कल्पना मनोहर पाडवी आणि विलास वळवी या  मित्रांसमोर मांडली.  यातले विलास वळवी हे धुळ्यात क्रीडा प्रशिक्षक आहेत.  या तिघा मित्रांनी धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील गाव-पाड्यांवरील मुलांना एकत्र आणले. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने मुले घरीच होती.  त्यांचा खेळांचा सरावही थांबला होता. धनाजे बुद्रुक, ता.धडगाव येथे  या मित्रांनी ७० मुलांना एकत्र आणले. यात आपापल्या शाळा, महाविद्यालयात विविध क्रीडा प्रकारांमध्ये निपुण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक खेळाडू आहेत. त्यांना दुपारी दोन तास पाठ्य पुस्तकातले शिक्षणही  दिले जाते. नंतर खेळाचा सराव.  हा सराव शास्त्रशुद्ध आणि खडतर. कुठलाही मुलाहिजा न बाळगता मुलांकडून  तयारी  करून घेतली जात आहे. यात मुलगा-मुलगी असा भेद नाही.  १५ जूनपासून सुरू  असलेले हे प्रशिक्षण स्वयंप्रेरणा आणि समाजहितासाठी सुरू आहे. या मुलांमध्ये कोणाला पोलीस व्हायचे आहे तर कोणाला जागतिक दर्जाचा धावपटू. साधनसुविधांचा अभाव आहे पण मुलांचा  जोश तसूभरही कमी नाही. लॉकडाऊनमध्येही प्रशिक्षण मिळत आहे याचे या मुलांना समाधान आहे.
एकीकडे या मित्रांच्या कामाचे गुणगाण परिसरातील नागरीक करीत असताना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला याची माहिती मिळू नये याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. क्रीडा विभागाने किमान आवश्यक क्रीडा साहित्य या खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Eklavya from Satpuda's Kushi got Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.