डॉक्टर ठरला आपल्या रुग्णासाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST2021-05-04T04:13:36+5:302021-05-04T04:13:36+5:30

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे ...

The doctor became an angel for his patient | डॉक्टर ठरला आपल्या रुग्णासाठी देवदूत

डॉक्टर ठरला आपल्या रुग्णासाठी देवदूत

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने प्लाझ्माची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे. शहादा येथील आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. परेश पटेल यांच्याकडील एका रुग्णाची प्रकृती कोरोनामुळे गंभीर होती. प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्माची तातडीने आवश्यकता होती. परंतु, ज्या लोकांना याआधी कोविड होऊन गेला आहे अशाच व्यक्तीचा शोध सुरू होता. त्यामुळे अशा व्यक्तीचा शोध घेणे कठीण होऊन बसले. अशा व्यक्तीचा शोध घेणे शहादा येथून सुरू झाले आणि सगळीकडे अशी व्यक्ती शोधण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. त्यांनी प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्याचे डॉ. परेश पटेल यांना सांगितले. डाॅ. पटेल यांनी पुणे येथील एआयएमएस रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क करून प्लाझ्मा थेरेपीसाठी मार्गदर्शन घेतले. तरीही शहाद्यात प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्यामुळे डॉ. परेश पटेल यांनी स्वत: पुढे येऊन त्वरित रात्री धुळे येथे धाव घेतली. तेथील अर्पण रक्तपेढी येथे स्वत:चा प्लाझ्मा दान करून तो प्लाझ्मा आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाला देऊन प्राण वाचविले. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे व लवकरच बरे होतील यासाठी डॉक्टर मेहनत घेत आहेत.

प्लाझ्मा दान कोणास करता येईल?

कोरोनाच्या आजारातून बरी झालेली व्यक्ती २८ दिवसांनंतर प्लाझ्मा दान करुन प्लाझ्मा दाता ठरू शकतो. परंतु, त्यासाठी काही निकष आहेत. १८ ते ६० वर्षे, गर्भधारणा न झालेली स्त्री, वजन किमान ५० किलो, प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज व प्रोटीन्सचे योग्य प्रमाण असणे व बाकीचे सर्व निकष रक्तदानासाठी असणाऱ्या निकषांप्रमाणेच आहेत. प्लाझ्मादान हे संपूर्णपणे निर्धोक असून, त्यासाठी एक तास लागत असल्याची माहिती मिळाली.

असे आहेत रक्तगट

रुग्णाचा रक्तगट प्लाझ्मा दात्याचा रक्तगट

ए ए, एबी

बी बी, एबी

एबी एबी

ओ ओ, ए, बी, एबी

रुग्णालयात कोविड रुग्णाला प्लाझ्माची आवश्यक होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी प्लाझ्माची शोधाशोध करूनही मिळत नसल्याने मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होतो. त्या अनुषंगाने धुळे येथील अर्पण रक्तपेढीला भेट देऊन अँटीबॉडीज तपासणी करून प्लाझ्मा काढून रुग्णालयात दाखल रुग्णाला दान केले. यामुळे रुग्णाची प्रकृती चांगली असून, लवकरच सुटी करण्यात येईल. तसेच रुग्णांची वाढती संख्या आणि तुलनेने पात्र प्लाझ्मा दात्यांची कमी संख्या यामुळे कोणत्याच रक्तपेढीत आज कन्व्हेलसेंट प्लाझ्मा लगेच उपलब्ध होत नाही. प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घेऊन कोरोनाच्या रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी मदत करावी.

-डॉ. परेश पटेल, शहादा

सध्या प्लाझ्माचा तुटवडा पाहता शहादा शहरातही प्लाझ्मा संकलन सुरू करून नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. नागरिकांनी प्लाझ्मा दानसाठी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाइकांची फिरफिर होणार नाही व आपल्या प्लाझ्मा दानमुळे रुग्णाचा जीव वाचेल.

-डॉ. किशोर पाटील

Web Title: The doctor became an angel for his patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.