समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र; समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:17 IST2025-05-23T08:16:46+5:302025-05-23T08:17:37+5:30
आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर धुळ्यात आली.

समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र; समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : धुळे येथील विश्रामगृहावर आढळलेल्या रकमेशी विधानमंडळ आमदार समितीचा काहीही सबंध नाही. शिवाय समितीतील सदस्यांना देण्यासाठी साडेपाच कोटी रुपये विश्रामगृहात ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपातही तथ्य नाही, असे सांगत सरकार आणि समितीला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केला.
आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर धुळ्यात आली. या समितीतील आमदारांना देण्यासाठी अधिकारी यांनी साडेपाच कोटी रुपये गोळा केले व विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या रूममध्ये ठेवले आहेत, असा आरोप गोटे यांनी केला. त्याच रूमची तपासणी केली असता त्यात एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आमदार खोतकर यांच्याशी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला असता खोतकर यांनी धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेप्रकरणी करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.
विरोधकांचे समितीला व सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याबाबत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील जप्त करण्यात आलेली रक्कम शिंदेसेनेच्या आमदारांना देण्यासाठीच असल्याचा धक्कादायक आरोप केला. यावर राऊत यांना आरोप करायची जुनी सवय असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
चौकशीअंती गुन्हा
शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या नं. १०२ मध्ये सापडलेले १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस विभागातर्फे चौकशी सुरू असून आयकर विभागातर्फे ही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात सापडलेली रक्कम प्रकरणात सखोल तपास होणे गरजेचे असून, यासाठी नि:पक्षपाती चौकशी समिती स्थापन करून त्यात राज्यातील राहुल रेखावार, तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जावी. - अनिल गोटे, नेते उद्धवसेना
आ.अर्जुन खोतकर आणि त्यांचा पीए यांना तत्काळ अटक करा. कोट्यवधीचे सापडलेले घबाड हा सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. अधिकारी, कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळली गेली अशी चर्चा आहे. - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.