Vidhan Sabha 2019: परंपरागत बालेकिल्ला राखण्याची काँग्रेसची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:03 IST2019-09-25T12:54:58+5:302019-09-25T13:03:43+5:30
आय.जी.पठाण । लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : मतदार संघात भाजप-शिवसेनेची युती व जागावाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. कॉग्रेस व ...

Vidhan Sabha 2019: परंपरागत बालेकिल्ला राखण्याची काँग्रेसची कसरत
आय.जी.पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : मतदार संघात भाजप-शिवसेनेची युती व जागावाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाटणीत नवापूरची जागा कॉग्रेसच्या वाटय़ाला आली आहे. असे असले तरी येथे तिरंगी लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ सुटला नसल्याने येथे इच्छूक असलेले व पूर्वी स.पा.च्या तिकिटावर निवडून आलेले शरद गावीत हे कोणत्या पक्षाकडून उभे राहतात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
नवापूरात 2014 ची सार्वत्रिक निवडणूक प्रमुख राजकिय पक्षांकडुन स्वतंत्रपणे लढली गेली. त्यात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी आपल्या हातुन सुटलेली जागा पुन्हा ताब्यात घेत मतदार संघावर आपली निर्विवाद सत्ता स्थापित केली. राज्यस्तरावर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस तथा मित्र पक्ष यांच्या आघाडीची जागावाटपाची स्थिती जवळपास अंतिम झाली आहे. अपेक्षेनुसार नवापूरची जागा कॉग्रेसकडे राहणार हे देखील ठरले आहे. विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक वाढत्या वयोमान व प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढणार नाहीत तर त्यांच्या जागी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व त्यांचे ज्येष्ठ पुत्र शिरीष नाईक हे कॉग्रेसची उमेदवारी करणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. भाजपा-शिवसेना युती न झाल्यास भाजपाकडुन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व ज्येष्ठ कॉग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पुत्र भरत गावीत हे उमेदवारी करतील. युती न झाल्यास ही जागा कुणाकडे जाणार हे आज स्पष्ट नसले तरी भरत गावीत यांची निवडणुकीतील उमेदवारी राहणारच हे देखील ठरलेले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेससाठी जागावाटपात संधी नसली तरी माजी आमदार शरद गावीत हे नवापूरसाठी पूर्वीपासूनच तयारी करून आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांची भाजपसाठीची मेहनत होती. त्याच माध्यमातून त्यांनी विधानसभेची तयारीही करून घेतली होती. राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी व भाजपाकडे वळविण्यात आजवर ते यशस्वी झाले असल्याचे चित्र आहे. नवापूरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा इतिहास पाहता कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस अशीच प्रमुख लढत होत आली आहे.
मतदारसंघात अनेकजण इच्छूक : नवापूर मतदारसंघातआघाडी व युती सह अनेक इच्छुक निवडणूक लढण्यास तयार आहेत. मतांचे विभाजन होण्याची त्यात शक्यता जास्त असली तरी खरी लढत शिरीष नाईक, भरत गावीत व शरद गावीत यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
आघाडी व युतीबाबत संभ्रम कायम : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय या आधीच घेतलेला आहे. जागावाटपाचा निर्णय देखील झालेला असल्याने मतदार संघही जवळपास निश्चित झालेले आहेत. नवापूर मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला सुटलेला आहे. त्यामुळे काँग्रेस गोटातून तयारीला आरंभही करण्यात आलेला आहे. दुसरीकडे युतीबाबत निर्णय अद्यापी झाला नसल्याने नवापूर मतदार संघ नेमका कुणाकडे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपा-सेना युती व्हावी ही स्थानिक पातळीवर कार्यकत्र्यांची प्रामाणिक इच्छा आहे. तसे पाहता भाजपा व शिवसेना यांच्याकडून इच्छुकांच्या झालेल्या मुलाखती सत्रात अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपा व शिवसेनेला अद्याप खाते उघडता आलेले नाही. भाजपाच्या मोदी लाटेतही या मतदारसंघात काँग्रेसच वरचढ ठरलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील मतदानाडे लक्ष लागून आहे.
युती न झाल्यास समिकरणेही बदलणार नाहीत.. : भाजपा-सेना युती व्हावी अशी कार्यकत्र्यांची स्थानिक पातळीवर इच्छा आहे. मात्र जागावाटप किंवा इतर कारणावरून वरिष्ठ पातळीवर युतीबाबत चा निर्णय नकारात्मक राहिल्यास दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढतील. असे असले तरी मतदार संघात तुलनात्मक पाहिल्यास सेनेपेक्षा भाजपाचे प्रस्थ चांगले आहे. त्यामुळे युती न झाल्यास मतदारसंघातील समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील ही शक्यता धूसर वाटते.
अनेक नावांची चर्चा.. : नवापूर विधानसभा मतदार संघात अनेक नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून शिरीष नाईक, भाजपकडून भरत गावीत यांची नावे आघाडीवर आहेत. शरद गावीत कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतात याकडे उत्सुकता लागून आहे. या नावांशिवाय डॉक्टर उल्हास वसावे अपक्ष म्हणून उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. शिवसेनेकडून रमेश गोबजी गावीत यांनी मुलाखत दिली असली तरी अन्य नाव निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकते अशीही शक्यता आहे.
कॉँग्रेस वर्चस्वाला छेद
नवापूर विधानसभा मतदार संघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघावर आतापावेतो सुरुपसिंग नाईक यांनी प्रतिनिनिधीत्व केले आहे.
मतदार संघात सन 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे शरद गावीत हे विजयी झाले होते. काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच ही जागा अन्य पक्षाला गेली. मात्र समाजवादीचे यश केवळ एकच टर्म टिकू शकले. सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसतर्फे सुरुपसिंग नाईक हे पुन्हा विजयी झाले होते. मतदार संघावर असलेली काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत झाली.
चार महिन्यापूर्वी व त्याआधी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य व क्रमांक एकची मते मिळालीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी प्रकृतीच्या व वयोमानाच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या जागी त्यांचे पुत्र व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक हे उमेदवारी करतील हे जवळपास निश्चित झाले आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपा क्रमांक दोनवर राहिला. भाजपला कॉग्रेसपेक्षा सात हजार 333 मते कमी मिळाली होती व ही किमया शरद गावीत यांनी एक हाती साधली होती. यंदाच्या निवडणूकीत पक्ष कोणताही असो, शिरीष नाईक, भरत गावीत व शरद गावीत यांच्यात तिरंगी व काटय़ाची लढत होणार हे चित्र आहे.
होऊ घातलेल्या निवडणूकीत महिला मतदारांची संख्या 10 हजार 634 ने वाढली आहे.
2014 च्या मतदार संघात एकुण दोन लाख 65 हजार 136 मतदार होते. पुरुष एक लाख 32 हजार 236 तर महिला मतदार एक लाख 32 हजार 900 होते. 2019 च्याहोऊ घातलेल्या निवडणूकीत 22 हजार 478 मतदारांची वाढ होऊन यंदा दोन लाख 87 हजार 614 मतदारांची नोंद झाली आहे. त्यात महिला मतदार एक लाख 44 हजार 87 तर पुरूष मतदार एक लाख 43 हजार 526 व एक अन्य मतदाराचा समावेश आहे.