सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देतो म्हणून फसवणूक, शिरपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Updated: February 5, 2024 19:16 IST2024-02-05T19:15:22+5:302024-02-05T19:16:19+5:30
याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील दोन व मध्यप्रदेशातील एक अशा तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देतो म्हणून फसवणूक, शिरपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार : मध्यप्रदेशातून सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देतो असे सांगून तिघांनी एकाची एक लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी शिरपूर तालुक्यातील दोन व मध्यप्रदेशातील एक अशा तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील श्रीरामनगर भागात राहणारे प्रवीण शांतीलाल गायकवाड (४२) यांना शिरपूर येथील मनोज पवार व इतर दोघांनी सबसिडीवर मध्यप्रदेशातून ट्रॅक्टर मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून सप्टेंबर २०२१ ते जून २०२२ या दरम्यान वेळोवेळी पैसे घेतले. फोन पे व ऑनलाइनने वेळोवेळी एकूण एक लाख ३९ हजार रुपये घेतले. परंतु गायकवाड यांना ट्रॅक्टर मिळालेच नाही. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नंदुरबार दिवाणी न्यायालयात याबाबत तक्रार अर्ज केला. त्यानंतर तेथील आदेशावरून नंदुरबार उपनगर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली.
प्रवीण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मनोज राजेंद्रसिंग पवार (रा. बबळाज, ता. शिरपूर), किरण दिनेशसिंग परदेशी (रा. होळनाथे, ता. शिरपूर) व नरेंद्र बकाजी गिलासिया (रा.वासखेडी, जि.उज्जैन) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार राजेंद्र दाभाडे करीत आहेत.