पाडळदा शिवारात बिबटय़ाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:02 IST2019-11-19T12:02:05+5:302019-11-19T12:02:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील पाडळदा शिवारात बिबटय़ांचा मुक्त संचार वाढला असून, दिवसा ढवळ्या हे बिबटे पशुंना फस्त ...

पाडळदा शिवारात बिबटय़ाचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील पाडळदा शिवारात बिबटय़ांचा मुक्त संचार वाढला असून, दिवसा ढवळ्या हे बिबटे पशुंना फस्त करीत असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या संदर्भात वनविभागाकडे तक्रारी करूनही त्याबाबत दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
सध्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचा संचार वाढला आहे. शेतीची कामे सुरू असल्याने दिवसा ढवळ्या कामाच्या वेळी शेतकरी व मजुरांना हे बिबट्टे दृष्टीक्षेपास येत असल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पाडळदा शिवारात चार बिबटय़ांचा संचार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विविध भागात हे बिबट्टय़े नागरिकांना दिसले आहेत. सोमवारी याच शिवारात शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असतांना अचानक बिबटय़ा या शेतात आला. ज्या ठिकाणी मजूर काम करीत होते. तेथेच मजुरांचा सामान व त्यांनी पाळलेले दोन कुत्रेही होते. या वेळी बिबटय़ा एका कुत्र्याला फडश्यात घेऊन पसार झाला. मजुरांनी त्यांच्या डोळ्यादेखत हे सर्व चित्र पाहिल्याने ते भयभित झाले. अशा घटनांमुळे शेती कामांवरदेखील परिणाम होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेऊन या भागात बिबट्टय़े पिंजरे लावून त्यांना जेरबंद करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.