पत्नीचे अवैध संबध माहिती झाल्याने पत्नीने प्रियकरासह काढला पतीचा काटा
By मनोज शेलार | Updated: September 1, 2023 18:12 IST2023-09-01T18:11:56+5:302023-09-01T18:12:51+5:30
नरपत घरात असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केले.

पत्नीचे अवैध संबध माहिती झाल्याने पत्नीने प्रियकरासह काढला पतीचा काटा
नंदुरबार : पत्नीचे अनैतिक संबंध माहिती झाल्याने पतीने पत्नीशी वाद घातला. त्याचा राग येऊन पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना सुरवाणी पाडा, ता. अक्कलकुवा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरपतसिंग नोबल्या पाडवी (३८), रा. सुरवाणी, ता. अक्कलकुवा, असे मयताचे नाव आहे, तर सिपा नानजी पाडवी (३८) व जेबाबाई नरपतसिंग पाडवी (३५) रा. सुरवाणी पाडा, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस सूत्रांनुसार, सुरवाणी पाडा येथील जेबाबाई व सिपा यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय नरपतसिंग यांना होता. त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. त्यामुळे सिपा व जेबाबाई यांनी नरपतसिंग याचा काटा काढण्याचे ठरविले.
नरपत घरात असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केले. याबाबत मयत नरपतसिंग यांचा मोठा भाऊ तेजला पाडवी यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भेट दिली.