पाच वर्षात १ हजार ३२८ रक्तबॅगांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:16 IST2019-04-23T12:15:58+5:302019-04-23T12:16:22+5:30
‘ब्लड आॅन कॉल’ : दुर्गम भागात रक्तदानाबाबत निरुत्साह, जनजागृतीची आवश्यकता

पाच वर्षात १ हजार ३२८ रक्तबॅगांचा पुरवठा
नंदुरबार : जीवन अमृत योजनेंतर्गत असलेल्या ‘ब्लड आॅन कॉल’ सेवेव्दारे २०१४ ते मार्च २०१९ म्हणजे जवळपासून पाच वर्षात केवळ १ हजार ३२८ रक्तबॅगांचा पुरवठा करण्यात आला आहे़ दुर्गम भागातील ग्रामस्थ रक्तदानात फारसे सक्रीय नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे़
वाढते अपघात, गरोदरपण, लहान बालक आदींसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते़ त्यामुळे रक्तअभावी प्राणहानी होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून २०१४ पासून जीवन अमृत योजना सुरु करण्यात आली़ या अंतर्गत जिल्ह्यासामान्य रुग्णालयामार्फत नोंदणीकृत असलेल्या दवाखान्यांना मागणीनुसार रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ शहर हद्दीच्या ४० किमी अंतराच्या परीक्षेत्रात या रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ नंदुरबार तालुक्यात २८ नोंदणीकृत दवाखाने या योजनेअंतर्गत रक्त बॅगा पुरवठ्यास पात्र ठरतात़ शासकीय धोरणानुसार १०४ क्रमांकाला दूरध्वनी केल्यानंतर सुमारे अर्धा तासात रक्ताचा पुरवठा करणे बंधनकारक असते़ त्यानुसार, २०१४ साली १७० रक्त बॅगा पुरवण्यात आल्या़ त्याच प्रमाणे २०१५ - १२८, २०१६ - १४४, २०१७ - ११३ , २०१८-३७ तर मार्च २०१९ पर्यंत ७३६ रक्त बॅगांचा पुरवठा ‘ब्लड आॅन कॉल’व्दारे करण्यात आला आहे़
शहरापासून ४० किमी अंतरांतर्गत असलेल्या एखाद्या रुग्णाला तत्काळ रक्ताची आवश्यकता असल्यास तो १०४ क्रमांकाच्या टोल फ्री नंबरला दूरध्वनी करुन रक्ताची मागणी करू शकतो़ त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अर्धा तासाच्या आत संबंधित रुग्णाला रक्ताचा पुरवठा करण्यात येत असतो़ परंतु योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये माहिती नसल्याने अनेक लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे़
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गरोदर माता, लहान बाळ, पिवळे रेशन कार्डधारक, जेष्ठ नागरिक, सिकलसेलग्रस्त आदींसाठी मोफत रक्त बॅगांचा पुरवठा करण्यात येत असतो़ जवळपास ९० टक्के रक्त पुरवठा हा मोफत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सामान्य प्रशासनाकडून देण्यात आली़ त्याच प्रमाणे इतर गरजुंना ठराविक रक्कम मोजून रक्तबॅग पुरवठा करण्यात येत असतो़ उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मागणीनुसार रक्ताचा पुरवठा करण्यास प्रचंड प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असते़
अनेक वेळा दुर्गम भागात रक्तदान शिबिरे घेण्यात येत असतात़ परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसतो़ बोटावर मोजण्याइतकेच जण रक्तदानात सहभाग घेत असतात़ त्यामुळे रक्तदानात सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे़