अज्ञात वाहनाच्या धडकत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 16:27 IST2019-10-15T16:25:00+5:302019-10-15T16:27:36+5:30
नांदेड ते नरसी महामार्गावर काकांडी शिवार जवळ अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
नवीन नांदेड: अज्ञात वाहनाच्या जबर धडकेने नांदगाव (ता. लोहा) येथील एक २६ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नांदेड ते नरसी महामार्गावर काकांडी शिवार जवळ घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव (ता. लोहा) येथील तरुण लक्ष्मण श्रीराम भरकडे हा आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास दुचाकीवर नांदेड येथून काकांडी मार्गे नांदगावकडे जात होता. दरम्यान, महामार्गावरील काकांडी शिवाराजवळ अज्ञात वाहनाने त्याला दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर अज्ञात वाहन तेथून निघून गेले. यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे अंमलदार डी. एम. गिते व पो. कॉ. नितीन धुळगंडे यांनी दिली. लक्ष्मणच्या मृत्यूमुळे नांदगाव व मारतळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई,वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
याप्रकरणी अवधूत श्रीराम भरकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पो. नि. पंडितराव कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजीव म्हात्रे, नाईक पो.कॉ. रामचंद्र पवार व नाईक पो. कॉ. नागनाथ दिपके हे याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.