नांदायला येणार की नाही? पतीने मोबाइल टॉवरवर चढून पत्नीस केला निर्वाणीचा व्हिडिओ कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:16 IST2025-02-11T17:16:17+5:302025-02-11T17:16:47+5:30
लोह्यात मोबाइल टाॅवरवर चढून पतीचे आंदोलन

नांदायला येणार की नाही? पतीने मोबाइल टॉवरवर चढून पत्नीस केला निर्वाणीचा व्हिडिओ कॉल
लोहा (जि.नांदेड) : माहेरी गेलेल्या पत्नीला नातेवाईक सासरी परत पाठवत नसल्याने पती शहरातील बसस्थानक परिसरातील २०० फूट उंच मोबाइल टॉवरवर चढला. येथून व्हिडिओ कॉल करत नांदायला येणार की नाही असे निर्वाणीचे विचारत पतीने खाली उडी मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हे दांपत्य मुकबधिर आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, शादुल शेख (रा. बेटमोगरा ता. मुखेड) याची पत्नी माहेरी गेली आहे. आठवडा उलटून गेला तरी पत्नी परत आली नाही. पत्नीचे माहेरचे नातेवाईक तिला नांदायला पाठवत नसल्याचे पती शादूलला समजले. यामुळे टोकाचा निर्णय घेत पती सोमवारी सायंकाळी शहरातील बसस्थानक परिसरातील मोबाईल टॉवरवर चढला. वर चढण्यापूर्वी उडी मारून आत्महत्या करणार असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितले होते.
दरम्यान, शादुल शेख याने टॉवरच्या टोकावर जात तेथून पत्नीला व्हिडिओ कॉल केला. दोघेही पतीपत्नी मूकबधिर आहेत. दोघांत तब्बल एक तासांची चर्चा होऊन तोडगा निघाला. त्यानंतर हे थरारनाट्य थांबले. यावेळी गर्दी जमली होती. तब्बल एक तासाच्या थरारनाट्यानंतर पोलिस व नातेवाईकांच्या मध्यस्थीने पतीस टाॅवरवरून खाली उतरविण्यात यश आले.