हदगाव: कौटुंबिक वादातून आधी पत्नीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पत्नीचा मृतदेह पाहून पतीनेही रेल्वेसमोर उडी घेऊन स्वतःला संपवल्याची घटना १ मे रोजी छत्रपती संभाजीनगरात घडली. भाऊराव पुंजाजी सोनाळे (४५) आणि वैशाली भाऊराव सोनाळे (४०) अशी मृतांची नावे असून दोन मुले पोरकी झाली आहेत.
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील भाऊराव पुंजाजी सोनाळे हे २० वर्षांपूर्वी पत्नी वैशालीसोबत छत्रपती संभाजीनगर येथे रोजगाराच्या शोधात आले. वाळूज महानगर येथे हाताला चांगल्या पगाराचे काम मिळाल्याने ते जोगेश्वरी येथेच स्वतःचे घर बांधून स्थायी झाले. त्यांना दोन मुले आहेत. एकाने बारावीची तर दुसऱ्याने दहावीची परीक्षा दिली. परीक्षा संपताच दोन्ही मुल नांदेड येथील आजोळी आले.
दरम्यान, १ मे रोजी पतीपत्नीमध्ये वाद झाले. त्यानंतर पत्नी वैशाली हिने मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर जवळील जोगेश्वरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर पत्नीचा मृतदेह पाहून भितीपोटी भाऊराव याने देखील दि २ मे रोजी मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवले. दोघांच्या टोकाच्या निर्णयाने मात्र दोन्ही मुले पोरकी झाल्याने गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.