नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांच्या अपेक्षा भंग झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
संपूर्ण वर्ष कोरोना महामारीच्या सावटाखाली गेले आहे. अजूनही कोरोनाचे संकट कमी झाले नाही. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे व बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने हे वर्ष सर्वसामान्यांसाठी अत्यंत कठीण गेले. कोरोना आणि महागाईसोबत दोन हात करताना जनता हताश झाली आहे. या वर्षाच्या प्रारंभालाच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या. हे सरकार नक्कीच सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेईल, असे वाटत होते. मात्र हा अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कोरोनामुळे हे वर्ष खूप कठीण गेले. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे वाढत्या महागाईने गोरगरिबांचे जगणे अवघड झाले आहे. अशा वेळी तरी सरकारने मदत करण्याची गरज होती.
- प्रीती वाघमारे, सर्वसामान्य गृहिणी
लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडून गेली आहे. महागाईने कळस गाठला आहे. सात, आठ महिने दळणवळण बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हा अर्थसंकल्प काही देईल असे वाटत नाही.
- गजानन सावकार, किराणा दुकानदार
या सरकारकडून अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे आहे.कारण मागील चार, वर्षांपासून सामान्यांसाठी हिताचे निर्णय घेतले नाहीत. खाजगी क्षेत्रातील पगारवाढ थांबलेली आहे. तर इकडे महागाई वाढली आहे.
- शरद जाधव, खाजगी नोकरदार
मागील वर्ष हे निश्चित सर्वांची कसोटी घेणारे ठरले. त्यामुळे या बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी ठोस निर्णय नसल्याने सामान्य व्यापारी काय प्रतिक्रिया देऊ शकतो. अपेक्षा अधिक आहेत, मात्र त्या फोल ठरत आहेत.
- शेख इब्राहीम, व्यापारी
मागील सात, आठ महिने ऑटो रिक्षा बंदच होत्या. हजारो चालकांवर उपासमारीची वेळ आली. सरकारकडून ऑटो चालकांसाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यातच आता पेट्रोलचे दर वाढल्याने अवघड झाले आहे.
-संतोष भालेराव, ऑटो चालक
प्रत्येक अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांचा लाभ कधीच शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्ग संकटाचा सामना करताना सरकारकडून भरघोस मदतीची गरज आहे.
- लक्ष्मण चंदेल, शेतकरी
कोरोनामुळे दळणवळणाचे कंबरडे मोडले आहे. अजूनही या क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. पेट्राेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी परवडत नसल्याची ओरड आहे. हे बजेट सामान्यांचे व्हावे, हीच अपेक्षा.
- विशाल पावडे, पेट्राेल पंप चालक
यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीवर जास्त भर दिला आहे. लाॅकडाऊनच्या काळात आपणास कृषी क्षेत्राने मोठी मदत दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे बजेट लाभदायी आहे.
-दत्तात्रय टिकोरे, ज्येष्ठ नागरिक
बजेट काय असते हे माहिती नाही, पण सरकार काही तरी वर्षाला घोषणा करते हे माहित आहे. आम्हाला याची माहिती नसली तरी सरकारने आम्हा गोरगरिबांसाठी काही तरी चांगले करावे.
-मनिषा कांबळे,भाजीपाला विक्रेत्या
अर्थसंकल्पात केवळ आरोग्य क्षेत्रावरील वाढत्या खर्चाची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवता येईल अशी यंत्रणा विकसित करावी, एवढी अपेक्षा आहे.
- शंकर स्वामी, युवक
रेल्वेस्थानक
सध्या कोरोनामुळे नांदेड रेल्वे स्थानकावर गाड्यांची ये- जा कमी असल्याने प्रवाशांची वर्दळही तशी कमीच आहे. मात्र दोन प्रवासी सरकारच्या बजेटविषयी अपेक्षा व्यक्त करताना चर्चा करत होते.
बसस्थानक
नांदेड येथील बसस्थानकावर नेहमीसारखीच गर्दी होती. शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचे पडसाद बसस्थानकातील प्रवाशांवर विशेष उमटले नाहीत. ते आपल्याच घाईगडबडीत होते. गाडी कधी लागेल, याची प्रतीक्षा त्यांना होती.