पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

By प्रसाद आर्वीकर | Published: March 22, 2024 07:15 PM2024-03-22T19:15:55+5:302024-03-22T19:16:37+5:30

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही.

Water reservoirs dried up; Scarcity hit Parbhani, Hingoli districts along with Nanded | पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

नांदेड : मागील वर्षी पावसाचा ताण पडल्याने नांदेडसहपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईची आतापासूनच चिंता लागली असून, पाणीपुवठा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे शहरी भागात नागरिकांना पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या डोक्यावर हंडा आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून, दररोज पाणीसाठा कमी होत चालला आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याने भूजल पातळीवरही परिणाम होत आहे. खासगी बोअर, विहिरींची पातळी कमी होत आहे. तसेच अनेक जलस्रोतांचे पाणीही आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.

नांदेड पाटबंधारे मंडळाडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या ३८ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यात ४२ टक्के तर परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यातील आणखी दोन महिने शिल्लक असून, प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईची धास्ती आतापासूनच घ्यावी लागणार आहे.

परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्के
परभणी जिल्ह्यात उच्च पातळी बंधारे, लघू प्रकल्प आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात मिळून १०९ दलघमी पाणी साठवण करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १६.४० दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी १५ टक्के एवढी आहे.

नांदेडमध्ये ३८ टक्के तर हिंगोलीत ४२ टक्के साठा
नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, त्यामध्ये नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ४८ टक्के, मानार प्रकल्पात ३४ टक्के, मध्यम प्रकल्पांत ३१ टक्के, उच्च पातळी बंधाऱ्यात ४१ टक्के पाणीसाठा आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये येलदरी प्रकल्पात ४० टक्के, सिद्धेश्वर ६१ टक्के, लघू प्रकल्पात २३ टक्के, आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात ४० टक्के साठा आहे.

ग्रामीण भागालाच टंचाईच्या झळा
उन्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन दरवर्षी केले जाते. त्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी केली जाते. मात्र त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही तपशील आराखड्यात नमूद केला जातो. मात्र उपाययोजना सुरू होईपर्यंत ग्रामस्थांना टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात. याउलट शहरासाठी मात्र जून महिन्यापर्यंत लागणारे पाणी राखीव ठेवले जाते. त्यामुळे शहरात तेवढी टंचाई जाणवत नाही. पण, ग्रामीण भागाला झळा सहन कराव्या लागतात.

प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारी)
जिल्हा यावर्षी मागील वर्षी

नांदेड ३७.८३ ४८.२५
हिंगोली ४१.४९ ६७.९९
परभणी १४.९६ ४५.१४

Web Title: Water reservoirs dried up; Scarcity hit Parbhani, Hingoli districts along with Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.