एक्झिट पोलवर मत नोंदविले; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:29 IST2019-03-21T00:28:47+5:302019-03-21T00:29:15+5:30
व्हॉटस्अॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

एक्झिट पोलवर मत नोंदविले; गुन्हा दाखल
नांदेड : व्हॉटस्अॅप ग्रूपवरील एक्झीट पोलवर मत नोंदवल्याची तक्रार सी-व्हीजील अॅपद्वारे प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करुन गोपाळचावडीचे माजी सरपंच साहेबराव सेलूकर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून निवडणूक विभागाने विविध आचारसंहिता पथके तसेच भरारी पथके स्थापन केली आहेत. १९ मार्च रोजी सी-व्हीजील अॅपद्वारे नांदेड दक्षिणच्या आचारसंहिता पथकाकडे व्हॉटस्अॅपद्वारे एक्झीट पोल सांगितला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. भरारी पथक क्र. ३ ने गोपाळचावडी येथील माजी सरपंच साहेबराव पाटील सेलूकर यांच्याकडील फोन चेक केला. सेलूकर यांनी त्यांच्या व्हॉटस अॅपवर असलेल्या बळीरामपूर ग्रूपवर एक्झीट पोलवर आपले मत नोंदवले होते. ही बाब त्यांनीही चौकशीत मान्य केली. या सर्व प्रकरणाचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले. त्यात सेलूकर यांनी आचारसंहिता भंग केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पथकाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.