जिल्ह्यात २०२२पर्यंत चालणार लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:23+5:302021-06-02T04:15:23+5:30
जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात ...

जिल्ह्यात २०२२पर्यंत चालणार लसीकरण मोहीम
जिल्ह्यातील ९६ केंद्रांवर सध्या कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत चार लाख २९ हजार ३६२ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण लसीअभावी राज्यस्तरावरूनच थांबविण्यात आले आहे. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील एक लाख ४४ हजार १२५ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ हजार ५८७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी शहरातील पाच केंद्रांवर लस देण्यात येत होती. त्यानंतर या केंद्राची संख्या ९६ वर पोहोचली आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे चार लाख दोन हजार ६३० आणि कोव्हॅक्सिनचे एक लाख १९ हजार ९४० अशा एकूण पाच लाख २२ हजार ५७० लस प्राप्त झाल्या आहेत. त्यातून लसीकरण करण्यात आले आहे.
चौकट----------------
जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. या वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २२ हजार १८६ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस अद्याप देता आलेला नाही.
चौकट-------------
जिल्ह्यात ९४ लसीकरण केंद्र सुरू
जिल्ह्यात प्रारंभी पाच केंद्रांवर लस दिली जात होती. त्यानंतर मनपा हद्दीत आणखी पाच केंद्र वाढविण्यात आली. टप्प्याटप्प्याने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. आज घडीला ९४ केंद्रांवर लस दिली जात आहे. त्यामध्ये मनपा हद्दीत ११ लसीकरण केंद्र आहेत. या केंद्रांवर दररोज लसीकरण सुरू असून, प्राप्त झालेल्या लसींचा साठा विभागून प्रत्येक केंद्रावर पाठविला जात आहे.
चौकट-------------
जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत असून, यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागापर्यंत आरोग्य यंत्रणेमार्फत लसीची आवश्यकतेविषयी जनजागृती केली आहे. प्रारंभी लस उपलब्ध असताना जिल्ह्यात प्रतिदिन १८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आता लस उपलब्धता कमी झाल्याने प्रतिदिन जिल्ह्यात ३ ते ४ हजार नागरिकांना लस दिली जात आहे. शासनाकडे वेळोवेळी लसींची मागणी केली जात आहे. झालेल्या लसपुरवठ्यातून प्रत्येक केंद्रावर लस पुरवली जात आहे. जितक्या लसी जास्त प्राप्त होतील तेवढे लसीकरण वेगात केले जाईल.
- डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी, नांदेड