मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 12:07 IST2021-09-01T12:05:01+5:302021-09-01T12:07:21+5:30
Minister Ashok Chavan News : सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्ती असल्याची माहिती आहे.

मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक
नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरावर बुधवारी सकाळी अज्ञात महिलेने दगडफेक केली. या दगडफेकीत चव्हाण यांच्या घराच्या प्रवेश द्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांच्या कक्षाच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेकीनंतर महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, सदरील महिला ही मनोरुग्ण असून तिच्यासोबत एका गाड्यावर अपंग व्यक्तीही असल्याची माहिती आहे. याच भागात राहणारे माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरापासून ती महिला गोंधळ घालत चव्हाण यांच्या घरापर्यंत आली. कुणी तरी हा मंत्र्यांचा बंगला असून भीक मिळते असे सांगितल्याने महिला घरात प्रवेश करीत होती. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तिला अडविले. त्याच्या रागातून तिने दगडफेक केली असल्याची माहिती आहे. यावेळी अशोकराव चव्हाण किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही सदस्य घरी नव्हते. दरम्यान, शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असून पुढील कारवाई सुरु आहे.