दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:44 IST2021-04-24T19:42:29+5:302021-04-24T19:44:22+5:30
Death in Accident हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता.

दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू
नांदेड: अवघ्या तीन दिवसानंतर बोहल्यावर चढण्याची तयारी करीत असलेल्या नवरदेवाचा दुचाकीवरुन जात असताना अपघातातमृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास खडकी फाटा येथे घडली. नवरदेव हिमायतनगर येथे खरेदीसाठी गेला होता.
हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता. दोन्ही कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. नवरदेव राजू वाळके हा किरकोळ खरेदीसाठी एम.एच.२६, बीके. ३३९२ या क्रमांकाची दुचाकी घेवून हिमायतनगर येथे गेला होता. या ठिकाणी खरेदी केल्यानंतर तो गावाकडे परत येत होता. वाळके याची दुचाकी विना क्रमांकाच्या एका दुचाकीवर जावून आदळली. या अपघातात राजू हा गंभीर जखमी झाला होता. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील श्रीगणेश कलाले आणि विनोद वांगे (रा. खडकी बाजार) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताने खडकी गावावर शोककळा पसरली आहे.