नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:35 IST2025-02-20T15:30:44+5:302025-02-20T15:35:01+5:30
शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

नांदेड गोळीबार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत
नांदेड : शहरातील गुरुद्वारा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून, छत्रपती संभाजीनगर ‘एटीएस’सह आता स्थानिक काही पोलिस अधिकाऱ्यांनाही या तपासात घेण्यात आले आहे.
आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्यात शूटरला मदत करणाऱ्या नांदेडातील आणखी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यातील एक आरोपी तर या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे पुढे आले आहे.
१० फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास गुरुद्वारा परिसरातील गेट क्रमांक ६ च्या पार्किंगमध्ये एकाने दोघांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा नातेवाईक रवींद्रसिंघ राठोड हा मृत्यू पावला होता. विशेष म्हणजे गुरुमितसिंघ हा दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा भाऊ सत्यपालसिंग यांच्या हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणात दहशतवादी रिंदाचे कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून शूटरची ओळख पटविली होती. शूटरने रेकी करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी ज्यांच्या वाहनांचा वापर केला अशा दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती; परंतु शूटर हा बाहेरराज्यातील असल्यामुळे हा तपास छत्रपती संभाजीनगर ‘एटीएस’कडे देण्यात आला. ‘एटीएस’ आणि पंजाबच्या ‘एसटीएफ’ने अमृतसर येथून हर्षदीपसिंघ भजनसिंग याला पकडले. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यानेही शूटरला मदत केली होती. त्यानंतर नांदेडातीलच राजू गिल आणि दलजितसिंघ या दोघांना मंगळवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. या दोघांनीही शूटरला पैसे, शस्त्र पुरविणे यासह त्याच्या निवासाची व्यवस्था केल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे गोळीबार प्रकरणात गिलचा महत्त्वाचा रोल असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हल्लेखोरांना मदत करणारे अडचणीत
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणात दोन हल्लेखोरांना मदत करणारे जवळपास २५ हून अधिक जण अद्यापही तुरुंगात खितपत पडले आहेत. भावनेच्या भरात यापैकी अनेकांना शूटरला मदत केली होती. या सर्वांचे कुटुंब आज अडचणीत आले आहे. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणातही पाहावयास मिळून येतो. त्यामुळे हल्लेखोराला मदत करणारे पुन्हा अडचणीत आले आहेत.