या संबंधी मोहम्मद वाजीद कुरेशी, मोहम्मद बाबु कुरेशी यांनी तक्रार दिली असून २७ जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजता देगलूर नाका परिसरात थांबले असता अय्युब मोहम्मद जान अय्युब आणि जब्बार अब्दुल एकबाल हे दोघे दुचाकीवर आले आणि आम्हाला गाडीवर बसवून गोदावरी नदी काठी घेवून गेले. तेथे मोहम्मद आमेर, इम्रान मन्नान तसेच अय्युबचा भाऊ आणि नौकरासह इतर व्यक्ती थांबले होते. त्यांनी लोखंडी रॉडने तसेच लाकडाच्या दांडक्याने बेदम मारहाण केली. या वेळी फिर्यादीचा मित्र रिझवान कुरेशी यालाही घटनास्थळी बोलावून मारहाण करण्यात आली. हा प्रकार २७ जानेवारीच्या रात्री साडे आठ ते २८ जानेवारीच्या पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होता. या मारहाणीचा व्हिडीओ तयार करुन आरोपींनी तो व्हायरलही केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले होते. या फिर्यादीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे करीत असून या प्रकरणात आजवर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणारे सर्व आरोपी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोंडून मारहाण प्रकरणी आणखी दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST