नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:35 IST2025-08-09T15:26:39+5:302025-08-09T15:35:01+5:30
नांदेडमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची चोरट्या मार्गाने तस्करी सुरू आहे.

नांदेडमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
नांदेड : प्रतिबंधित अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्याच्या हेतूने तस्करी करताना विमानतळ पोलिसांनी गुरुवारी पहाटे दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७.३१ ग्रॅम हेरॉईन आणि प्रीगलॅब-३०० चे सहा पॅकेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जेरबंद आरोपींची नावे गुरूविरसिंह हरपालसिंह (वय ५५, निवासी नमस्कार चौक, नांदेड) आणि जगजितसिंग अवतारसिंग गिल (वय ४०, निवासी गुरुद्वारा गेट नं. २, नांदेड) आहेत.
नांदेडमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची चोरट्या मार्गाने तस्करी सुरू आहे. हे अमली पदार्थ इतर राज्यांमधून नांदेडमध्ये येतात आणि शहरातील तस्करांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. स्थानिक पोलिसांना फसवणूक देत हे अमली पदार्थ विक्रीचे काम अनेक दिवसांपासून सर्रासपणे चालू आहे. ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०:४५ वाजता विमानतळ पोलिसांना माहिती मिळाली की, दोन संशयित लोक नमस्कार चौकाजवळील पेट्रोल पंपावर अमली पदार्थ विक्रीसाठी उभे आहेत. त्यानंतर पोलिसांनी ७ ऑगस्टच्या पहाटे सुमारे ३:३३ वाजता या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेत असता, त्यांच्याकडे हेरॉईन आणि प्रीगलॅब-३००चा साठा आढळून आला.
पोलिसांनी सदर अमली पदार्थ जप्त करून दोघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.