भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 19:08 IST2023-07-05T19:07:24+5:302023-07-05T19:08:19+5:30
आज सायंकाळी भोकर ते म्हैसा रस्त्यावर झाला अपघात

भोकरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भोकर : येथील म्हैसा रस्त्यावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी आहे.
तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी कृष्णा भिवजी ढवळे (२५) हे दुचाकी ( क्र. एम एच २६ सीसी ३५११) वरुन भोकर येथून चिंचाळा येथे जात होते. दरम्यान, शहरातील म्हैसा रस्त्यावरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोरच समोरुन येणाऱ्या (क्र. एम एच २० डि एन ०७८०) दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कृष्णा भिवाजी ढवळे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील सचिन रोहिदास होळकर ( २२, रा. निवरवाडी ता. हदगाव) हा गंभीर जखमी झाला.
जखमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नांदेडला रवाना करण्यात आले. गंभीर जखमी सचिन होळकर हे एका फायनान्स कंपनीत वसुली विभागातील कर्मचारी असल्याचे समजते.