दोनदा वेळ बदलली मात्र तिसऱ्यांदा अडकलाच; १० हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहाथ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 13:36 IST2021-10-28T13:34:53+5:302021-10-28T13:36:39+5:30
bribe case : शेतजमीन नावे करण्यासाठी १२ हजाराची लाच तलाठ्याने मागितली होती. त्यातील पहिला १० हजाराचा हप्ता घेताना एसीबीची कारवाई.

दोनदा वेळ बदलली मात्र तिसऱ्यांदा अडकलाच; १० हजाराची लाच घेणारा तलाठी रंगेहाथ पकडला
हदगाव (नांदेड): एका शेतकऱ्याच्या नावे असेलेल्या दोन हेक्टर ५३ आर पैकी एक हेक्टर जमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी १२ हजाराची लाच तलाठ्याने मागितली. त्यापैकी १० हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून तलाठी संजय गजानन मेहुणकरला बुधवारी ( दि.२७ ) सायंकाळी रंगेहाथ ( talathi arrested by ACB while taking bribe) पकडले.
तळणी येथे एका शेतकऱ्याची दोन हेक्टर ५३ आर जमीन आहे. त्यापैकी एक हेक्टर जमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी शेतकऱ्याने कागदपत्रे तलाठी संजय गजानन मेहुणकरकडे दिली. त्याने यासाठी १५ हजार रुपयेची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये लाच ठरली. १० हजार सुरुवातीला आणि २ हजार काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक व्ही.एस.माने यांनी तक्रारीची शहानिशा केली. बुधवारी पथकाने सापळा लावला. प्रथम १२ वाजता भेटण्याचे तलाठ्याने सांगितले पण पुन्हा १:४५ वाजता भेटु असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यासोबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी होते. त्यामुळे लाच घेण्याचे टाळत तलाठी मेहूणकरने सायंकाळी ५:४५ वाजता हदगाव-तामसा रस्त्यावरील तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयात बोलावले. येथे ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने १० हजार रुपये तलाठी संजय मेहूणकरला देताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. फेरफार करून सातबारा नोंद घेण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरून तलाठी संजय गजानन मेहुणकर यास पथकाने अटक केली.