नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपात चुरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 18:20 IST2017-12-15T18:09:06+5:302017-12-15T18:20:27+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.

नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपात चुरस
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घोषित झाली असून बँकेतील सत्ताधारी महाआघाडीच्या करारानुसार यावेळी अध्यक्षपद भाजपाला दिले जाणार आहे. परिणामी भाजपाचे गंगाधर राठोड व लक्ष्मण ठक्करवाड यांच्यात चुरस लागली आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. बँकेचे २१ संचालक निवडीसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ संचालक, काँग्रेस-५, भाजपा-७ तर शिवसेनेचा एक संचालक निवडून आले होते. त्यानंतर भाजपा-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्रित येवून सत्ता स्थापन केली. दरम्यान, प्रत्येक पक्षाला एक वर्ष अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे बापुसाहेब गोरठेकर यांना अध्यक्षपद देण्यात आले. वर्षभरानंतर शिवसेनेचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आ. चिखलीकर यांनी ३० सप्टेंबर रोजी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेंव्हापासून सदर पद रिक्त असून येत्या ३० डिसेंबर रोजी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दोन वर्षापूर्वी झालेली महाआघाडी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर आता अध्यक्षपद भाजपाकडे येणार आहे. बँकेच्या संचालकामध्ये भाजपचे दिलीप कंदकुर्ते, गंगाधरराव राठोड, लक्ष्मण ठक्करवाड यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी यातील कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालतात याची उत्सुकता आहे.
निवडणूक कार्यक्रम
जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणवीस यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३० या कालावधीत नामनिर्देशन पत्राचे वितरण तसेच स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर लगेच नामनिर्देशन पत्राची छाननी करुन निकाल दिला जाणार आहे. सकाळी ११.४५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास दुपारी ११.५० ते १२.१५ या कालावधीत मतदान घेवून निकाल घोषित केला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.