आज होणार देयकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:47 AM2018-03-14T00:47:12+5:302018-03-14T00:47:54+5:30

जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणी पुरवठा योजनेचे काम करणा-या सोहेल कन्स्ट्रक्शनने मंगळवारी आपला खुलासा तसेच पाईप खरेदीचे देयक महापालिकेकडे सादर केले आहे. या देयकाची महापालिका तसेच पोलिसांकडून शहानिशा केली जाईल. त्यानंतर या प्रकरणात कारवाईची दिशा निश्चित होईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

Today's bills inquiry | आज होणार देयकाची चौकशी

आज होणार देयकाची चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देठेकेदाराचा खुलासा : मुदतीच्या अंतिम क्षणी सादर केले देयक

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणी पुरवठा योजनेचे काम करणा-या सोहेल कन्स्ट्रक्शनने मंगळवारी आपला खुलासा तसेच पाईप खरेदीचे देयक महापालिकेकडे सादर केले आहे. या देयकाची महापालिका तसेच पोलिसांकडून शहानिशा केली जाईल. त्यानंतर या प्रकरणात कारवाईची दिशा निश्चित होईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.
प्रभाग १४ होळी येथे दलित वस्तीनिधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम केले जात आहे. हे काम सोहेल कन्स्ट्रक्शनमार्फत केले जात आहे. सदर कामावरील पाईप चोरीच्या असल्यच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी जप्त केले. तसेच एका प्लंबरला ताब्यात घेतले. त्यानंतरच्या घडामोडीत तेलंगणाताील पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करुन जवळपास २०० हून अधिक पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे सांगत पाईप इतवारा ठाण्यात जमा केले.
या प्रकरणात महापालिकेने कारवाई करताना काम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच पाईप खरेदीचे देयकेही मागवले. मंगळवारी सोहेल कन्स्ट्रक्शनचे मो. नजिर यांनी आपला खुलासा व पाईप देयक सादर केले. सदर पाईप नांदेड येथील विजय इंजिनिअरींग सर्व्हीसेस, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, उदयनगर येथून खरेदी केल्याचे सांगितले. हे देयके प्राप्त झाल्यानंतर महापालिका सदर देयकाची पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत खात्री केली जाणार आहे. तसेच सदर खुलासा आणि देयक पोलिसांना दिले जाणार आहे. ते पोलिसांनी तपासावे, असे आयुक्तांनी सांगितले. देयकाच्या चौकशीनंतर नेमका काय अहवाल येतो, याकडे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत गुन्हा का दाखल नाही ?- आयुक्त
सदर प्रकरणात पोलिसांनी एका प्लंबरला ताब्यात घेतले आहे. तसेच ठिक-ठिकाणाहून पाईपही जप्त केले आहेत. प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले जात असताना पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल आयुक्त देशमुख यांनी उपस्थित केला. पोलिसाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकाही या प्रकरणात निश्चितपणे ठोस कारवाई करेल, असे म्हणाले. तर दुसरीकडे पोलिसांकडून घटनास्थळ हे नांदेडात नसल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या प्लंबरने पाईप आणण्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानंतर पाईप आणल्याचे चौकशीत सांगितले. त्यामुळे ते पाईप आणण्यास सांगणारा कोण? हा प्रश्न पुढे आला आहे. पोलिसांना अद्यापही तो सापडला नाही. मागील तीन दिवसांतील पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयकल्लोळ निर्माण करणारी ठरली आहे.
सहकार्याची भूमिका?
पाणी पुरवठ्याच्या कामासाठी चोरुन आणलेल्या पाईपचा वापर केल्या जात असल्याचा ५ मार्च रोजी संशय आला. या संशयानंतर पोलिसांनी पाईप जप्त केले तर महापालिकेनेही ८ मार्च रोजी काम बंद केले. तसेच ९ तारखेला सोहेल कन्स्ट्रक्शनला पाईप खरेदीचे देयक सादर करण्याची नोटीस बजावली. या पहिल्या नोटीसला कंत्राटदाराने केराची टोपली दाखवली. त्यानंतर १२ मार्च रोजी अंतिम नोटीस बजावताना २४ तासाची मुदत दिली होती. त्यानंतर कुठे ठेकेदाराने खुलासा सादर करुन देयक दिले. या देयकाची चौकशी करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडेच सोपवली आहे. या प्रकरणात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवºयात असताना त्यांच्याकडेच चौकशी सोपवणे हा प्रकार म्हणजे चोराच्या हाती चाव्या, असाच ठरणारा आहे.

Web Title: Today's bills inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.