नांदेडमध्ये जवानांनी वाचवला चिमुकल्याचा जीव! ३५ फूट उंचीवर शिडी लावून केले यशस्वी रेस्क्यू
By अविनाश पाईकराव | Updated: March 5, 2026 17:56 IST2026-03-05T17:55:48+5:302026-03-05T17:56:29+5:30
नांदेडमध्ये अग्निशमन दलाचे ३५ फुटी शिडी लावून थरारक 'रेस्क्यू ऑपरेशन'

नांदेडमध्ये जवानांनी वाचवला चिमुकल्याचा जीव! ३५ फूट उंचीवर शिडी लावून केले यशस्वी रेस्क्यू
नांदेड : शहरातील केशवनगर भागातील एका इमारतीत गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरामध्ये खेळताना एक बालक दरवाजा लॉक झाल्याने खोलीत बंद झाल्याची घटना घडली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीवाटे थरारकपणे आत शिरून त्या बालकास सुखरूप बाहेर काढले.
५ मार्च रोजी दुपारी ठीक १:५५ च्या सुमारास, हनुमानगड कमानीजवळील 'वृंदावन निवास' या इमारतीत सतीश कंकरे यांचे एक वर्षाचे बाळ, शिवांश हा पहिल्या मजल्यावरील खोलीत खेळत होते. खेळता-खेळता अचानक खोलीचा 'डोअर लॉक' लागल्याने बाळ आतमध्ये एकटेच अडकले. पालकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. घाबरलेल्या पालकांनी तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधून मदतीची याचना केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी रेस्क्यू वाहनासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्याऐवजी जवानांनी इमारतीच्या पाठीमागच्या बाजूने खिडकीद्वारे आत शिरण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३५ फुटी शिडी लावून जवान खिडकीपर्यंत पोहोचले. त्यानंतर 'फायर हुक'च्या साहाय्याने बंद असलेल्या दरवाजाची कडी अत्यंत शिताफीने उघडण्यात आली.
नांदेडमध्ये थरार! १ वर्षाचे बाळ खोलीत अडकले; जवानांनी खिडकीतून वाचवले. #nanded#marathwada#RescueOperationpic.twitter.com/sSdbNfzJtR
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 5, 2026
अखेर जवानांनी चिमुकल्या शिवांशला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले, तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे, उप अग्निशमन अधिकारी नीलेश कांबळे, कर्मचारी उमेश ताटे, नरवाडे, मगरे, पठाण आणि वाहन चालक एस. नरवाडे यांनी कामगिरी बजावली.