पूल नाही, पण शेती तर करावीच लागेल; सहा गावांतील ग्रामस्थांचा नदीतून जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:20 IST2025-01-15T19:19:56+5:302025-01-15T19:20:19+5:30
शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून नदीपात्रातून जावे लागते शेतीकडे

पूल नाही, पण शेती तर करावीच लागेल; सहा गावांतील ग्रामस्थांचा नदीतून जीवघेणा प्रवास
- शेख शब्बीर
देगलूर (नांदेड) : पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्याने देगलूर तालुक्यातील जवळपास पाच व बिलोली तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेताला जाण्यासाठी जीव धोक्यात घालून नदीपात्रातूनच जावे लागत आहे. यामुळे मन्याड नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करून देण्याच्या मागणीचे निवेदन नुकतेच वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना देऊन प्रकरणात त्यांचे लक्ष वेधले आहे.
देगलुर तालुका व बिलोली तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीच्या दोन्ही बाजूला बिलोली तालुक्यातील गळेगाव व देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव, आलूर, शहापूर, लिंबा या गावातील शेतकऱ्यांची जवळपास 500 एकर शेत जमीनी आहेत. मात्र या शेतकऱ्यांना शेतातील मशागतीच्या कामासह इतर शेती कामासाठी तसेच ये- जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने सदरील शेतकऱ्यांना मन्याड नदीच्या पात्रातूनच जीव मुठीत धरून ये जा करावे लागत असल्याने या ठिकाणी शासनाने पर्यायी पुलाचे बांधकाम करून देण्याची मागणी अनेक वर्षापासून या भागातील शेतकरी वर्गाकडून सातत्याने केली जात आहे. यापूर्वीही शासनास दोन वेळेस निवेदन देऊन प्रकरणात त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या प्रश्नाबाबत शासन फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी ज्या ज्या वेळेस मन्याड नदीला पूर आला त्या त्यावेळी नदी काठा वरील शेतकरी दोन दोन दिवस शेतातच अडकून राहिला होता. त्यावेळी शासनाकडून मोठी कसरत करीत त्या शेतकऱ्यांना बोटीद्वारे सुखरूप बाहेर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याची घटना यापूर्वी अनेक वेळा घडली आहे.त्यातच मागील वर्षी मन्याड नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा जवळपास 35 ते 40 टक्के शेतकऱ्यांनी पेरणीच केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शासनाने या मन्याड नदीवर एक लहानसा पूल तयार करून द्यावा जेणेकरून पर्यायी पूल उपलब्ध नसल्याकारणाने जीव मुठीत धरून नदी पात्रातुन शेतीला जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसह शेतीच्या मशागती पासून शेतकरी वंचित राहणार नाही अश्या मागणीचे निवेदन नुकतेच वझरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन केली आहे.
जीवितहानी होण्याची शक्यता
शेताला जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने नदीच्या पाण्यातूनच जावे लागते. त्यातच अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच यंदा अनेक शेतकऱ्यांना पेरणी पासून वंचित रहावे लागले. त्यामुळे शासनाने तात्काळ छोटासा पूल बांधून द्यावा.
- मष्णाजी हुलबा औरादे, सरपंच, वझरगा