मुसळधार पावसात बस पूरात अडकली; चालक-वाहकासह प्रवाशांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:45 IST2022-07-12T17:44:42+5:302022-07-12T17:45:40+5:30
पुढे एका मोठ्या नाल्याला पूर आल्याने रस्त्यावरच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली.

मुसळधार पावसात बस पूरात अडकली; चालक-वाहकासह प्रवाशांचा जीव टांगणीला
- बी. व्ही. चव्हाण
उमरी (नांदेड) : हंगिरगा या गावाकडून उमरीकडे येणारी बस दोन्ही बाजूंनी पुराचे पाणी असल्याने रस्त्यावर अडकली. मंगळवारी सकाळपासून अडकली असून बसमधील प्रवासी तसेच चालक वाहकाची मोठी गैरसोय झाली.
आज उमरी येथील मंगळवार आठवडी बाजारचा दिवस असून यासाठी हंगिरगा ,मनूर ,अब्दुल्लापुर वाडी येथील अनेक प्रवासी उमरीकडे बसमध्ये बसून बाजारासाठी येत होते. यावेळी उमरीजवळ एक किलोमीटर अंतरावर असताना एका छोट्याशा नाल्यातून पार करून ही बस पुढे आली. मात्र, पुढे एका मोठ्या नाल्याला पूर आल्याने रस्त्यावरच चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविली. दुपारपासून या भागात पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला. तसतसा या नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे आता या बसला माघारी जाता येत नाही व पुढेही येता येत नाही. अशा परिस्थितीत ही बस उमरी शिवारात वाडी रस्त्यावर अडकली आहे.
सकाळी दहा वाजता पासून या बस मध्ये अनेक प्रवासी सुद्धा अडकले. त्यामुळे या प्रवाशांची उपासमार झाली आहे. सायंकाळी तहसीलदार माधव बोथीकर तसेच पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना ही माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रवाशांना तसेच बसमधील चालक वाहकांना उमरीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.