शेतीच्या वादाने सारे संपवले; पेरणी करत असतानाच बापाचा मुलांनी दाबला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 18:02 IST2022-07-02T18:01:58+5:302022-07-02T18:02:44+5:30
लोहा तालुक्यातील घटना, आरोपी दोघा मुलांना घेतले ताब्यात

शेतीच्या वादाने सारे संपवले; पेरणी करत असतानाच बापाचा मुलांनी दाबला गळा
लोहा (जि. नांदेड) : तालुक्यातील खेडकरवाडी येथे ३० जून रोजी शेतात पेरणी करत असताना शेतीच्या वादातून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हावगी नारायण कल्याणी (५०) असे मयताचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
हावगी कल्याणी यांनी पाच एकर शेती आपल्या दोन मुलांना न विचारता काही वर्षांपूर्वी परस्पर विकली होती. उर्वरित शेती ही आपल्या नावे करावी, अशी मागणी त्यांची दोन्ही मुले सचिन कल्याणी (वय २५), हनुमंत कल्याणी (वय ३२) यांनी केली होती. मात्र, वडील सहमत होत नसल्यामुळे या तिघांमध्ये सतत वाद व्हायचे. ३० जून रोजी शेतात पेरणी सुरू असताना वडिलांसोबत पुन्हा वाद सुरू झाला असता सचिन कल्याणी, हनुमंत कल्याणी या दोन्ही मुलांनी रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या बापाचा दोरीने गळा आवळून खून केला.
घटनेचा व्हिडीओ आरोपीच्या मोबाइलमध्ये
घटनेची माहिती मिळताच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या घटनेचा व्हिडीओ आरोपीच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्रभाकर वलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन हावगी, हनुमंत हावगी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे तपास करीत आहेत.