तपास यंत्रणांच्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’, नांदेड परिक्षेत्रातील सहा अधिकारी ‘एटीएस’साठी ठरले मदतगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:58 IST2025-02-21T10:58:02+5:302025-02-21T10:58:30+5:30
पोलिस अधिकारी व अंमलदारांची ‘टॅलेंट बँक’ तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तपास संस्थांना या टॅलेंट बँकेतील अधिकारी मदतगार ठरत आहेत.

तपास यंत्रणांच्या मदतीसाठी ‘टॅलेंट बँक’, नांदेड परिक्षेत्रातील सहा अधिकारी ‘एटीएस’साठी ठरले मदतगार
राजेश निस्ताने
नांदेड : महाराष्ट्र पोलिस दलात विविध विषयांतील अनेक एक्स्पर्ट अधिकारी दडलेले आहेत. या अधिकारी आणि अंमलदारांचे डेटा कलेक्शन केले गेले आहे. त्यातून पोलिस अधिकारी व अंमलदारांची ‘टॅलेंट बँक’ तयार करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील तपास संस्थांना या टॅलेंट बँकेतील अधिकारी मदतगार ठरत आहेत.
सीबीआय, एनआयए, एटीएस, एनसीबी यासारख्या संस्थांना तपासासाठी देशभर जावे लागते. अनेकदा स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागते. परंतु, स्थानिक पोलिसांचे त्या विषयातील ज्ञान मर्यादित असल्याने तपासात फारशी मदत मिळत नाही. ही अडचण ओळखून केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरच स्थानिक पोलिसांमधून त्या-त्या राज्यात टॅलेंट बँक बनविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पोलिस महासंचालकांच्या अखत्यारीत ही टॅलेंट बँक बनविली गेली.
तपासकामात उत्कृष्ट, गेल्या तीन वर्षांत उत्कृष्ट तपासासाठी पोलिस महासंचालक, केंद्रीय गृहमंत्री व राष्ट्रपतींचे पदक प्राप्त अधिकाऱ्यांच्या नावाचा या बँकेसाठी प्राधान्याने विचार केला गेला. याशिवाय अभियांत्रिकी पदवी घेतलेले अधिकारी, अंमलदार निवडले.
नांदेड परिक्षेत्रातील सहा अधिकारी ‘एटीएस’साठी ठरले मदतगार
नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात १० फेब्रुवारीला गोळीबाराची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला.
एटीएस मुंबईचे विशेष पोलिस
महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नांदेडच्या पोलिस उपमहानिरीक्षकांना १५ फेब्रुवारीला पत्र पाठवून टॅलेंट बँकेतील अधिकारी तपासासाठी उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
त्यानुसार, वसमत शहर, उस्माननगर, नियंत्रण कक्ष, सोनखेड, परभणी येथील पाच सहायक पोलिस निरीक्षक व एका पोलिस उपनिरीक्षकाला एटीएसला मदतगार म्हणून उपलब्ध करून दिले आहे.