भारताबाहेरही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे केंद्र सुरू करणार; कुलगुरू मनोहर चासकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:14 IST2025-05-02T14:14:16+5:302025-05-02T14:14:35+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.

भारताबाहेरही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे केंद्र सुरू करणार; कुलगुरू मनोहर चासकर
नांदेड : जागतिकीकरणाच्या काळात आम्ही प्रवाहासोबत स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवीत आहोत. शिक्षणाच्या गुणात्मकतेकडे लक्ष दिल्यामुळे विद्यापीठाकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे. या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी भाषांमधील प्रावीण्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास भारताबाहेरही विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा विचार विद्यापीठ करेल, असे मत कुलगुरू प्रा. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे बुधवारी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते. यामध्ये विविध देशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली वाहून संमेलनाला सुरुवात झाली. त्यानंतर विविध पातळ्यांवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी भारतातील वास्तव्याविषयीचे अनुभवकथन केले.
याप्रसंगी प्र. कुलसचिव प्रा. डी. डी. पवार, प्र. वित्त व लेखाधिकारी मो. शकील अब्दुल करीम, प्र. अधिष्ठाता प्रा. डी. एम. खंदारे, नवोपक्रम केंद्राचे संचालक प्रा. शैलेश वाढेर, स्पॅनिशचे प्राध्यापक मो. झिशान अली, ॲड. डॉ. पठाण नवीद हे उपस्थित होते. केंद्रातील कर्मचारी विजय अचलखांब आणि गंगाधर लुटे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते.