यूपीएससीत २८३ वा रँक अन् ऋषिकेश पालिमकरचे स्वप्न साकार; यशाने कौठा गावात जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:19 IST2026-03-07T12:08:37+5:302026-03-07T12:19:26+5:30
"आई-वडील दोघेही शिक्षक, मुलगा झाला मोठा अधिकारी!"; कंधारच्या ऋषिकेश पालिमकरची प्रेरणादायी यशोगाथा

यूपीएससीत २८३ वा रँक अन् ऋषिकेश पालिमकरचे स्वप्न साकार; यशाने कौठा गावात जल्लोष
कौठा (जि. नांदेड) : कंधार तालुक्यातील कौठा येथील ऋषिकेश रामकिशन पालिमकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात २८३ वा रँक पटकावून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले आहे.
ऋषिकेश यांचे वडील रामकिशन पालीमकर हे गोविंदराव पाटील माध्यमिक विद्यालय चिखली (ता. कंधार) येथे प्राध्यापक तर आई नायगाव तालुक्यातील मांजरम येथे शिक्षिका आहे. ऋषिकेश पालीमकर यांचे प्राथमिक शिक्षण मुखेड शहरातील गुरुदेव विद्यालयात तर माध्यमिक शिक्षण हे नांदेड येथे झाले. ऋषिकेश यांनी हैदराबाद, दिल्ली येथे यूपीएससीची तयारी केली. अभ्यासातील सातत्य, चिकाटी, शिस्तबद्ध दिनचर्या आणि स्पष्ट ध्येय यामुळे त्यांनी हे यश मिळविले. ऋषिकेश कौठा गावातील पहिलेच यूपीएससी अधिकारी ठरले आहेत. शुक्रवारी निकाल जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करत ऋषिकेशच्या यशाचा जल्लोष साजरा केला.
अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक
रात्रंदिवस अभ्यास केल्यामुळे मला हे यश प्राप्त करता आले. ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासाला घाबरून न जाता स्पर्धा परीक्षांकडे वळावे.
- ऋषीकेश पालिमकर, कौठा ता. कंधार