Success in the fight! 500 farmers get sugarcane money after four years | लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

लढ्याला यश ! ५०० शेतकऱ्यांना चार वर्षांनंतर मिळाले उसाचे पैसे

ठळक मुद्देसदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते.शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.

नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नव्हते. शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांच्या लढ्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ३८२ शेतकऱ्यांची ३१ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खाजगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. नंतरच्या काळात तो कारखाना परस्पर विकला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारी, ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी हा विषय मंडळाच्या अनेक बैठकींत लावून धरला. कारखान्यावर जप्तीची कारवाई करत अनेक वेळा लिलाव केला; परंतु शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. त्यानंतर भोकर येथील शेतकरी गोविंद गोपालपल्ली यांनी कारखान्याच्या अध्यक्षाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. कारखान्याच्या अध्यक्षाला पन्नास लाख रुपये अनामत ठेवण्याच्या अटीवर जामीन मिळाला.

परंतु  कारखान्याच्या अध्यक्षाने कारखान्यात शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गायब केले. त्यामुळे सदर कारखान्याकडे असलेले ४ कोटी २२ लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचे, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता; परंतु शेतकऱ्यांकडे असलेल्या पावत्यांआधारे नवीन रेकॉर्ड तयार केले व त्याची खातरजमा करून  यादीतील ३८२ शेतकऱ्यांना  ३० लाख ८८ हजार देण्याचा निर्णय राष्ट्रीय बँक प्राधिकरणाने घेतला आहे. हे पैसे अध्यक्षांनी जमा केलेल्या जमानतीसाठीच्या ५० लाख रुपयांतून अदा करण्यात येत असून, सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर सहसंचालक विभागामार्फत टाकण्यास  सुरुवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला दिल्यासंदर्भातील पावत्या तपासण्यात येत आहेत. त्यानुसार पैसे देण्यात येणार असल्याचेही विभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.

रेकॉर्ड नव्याने तयार 
सदर कारखान्याकडे किंवा प्रशासनाकडे थकीत बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे कोणतेही  रेकॉर्ड नव्हते. नव्याने रेकॉर्ड तयार केले. त्यानुसार ४५९ शेतकऱ्यांनी आपला ऊस गेला व पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी करून पुरावे सादर केले होते.  या सर्वांची खातरजमा करून शेतकऱ्यांच्या वारसदारांचे अर्ज प्राप्त झाले. त्यांना वारस असल्याचा पुरावा देण्यासंदर्भात कळविले आहे. त्यानुसार रक्कम देण्यात येईल, अशी माहिती नांदेडच्या प्रादेशिक साखर विभागाचे बी.एल. वांगे यांनी दिली.

Web Title: Success in the fight! 500 farmers get sugarcane money after four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.