गल्लीतल्या खेळाडूंना मिळालं 'IPL' सारखं ग्लॅमर! ८ तगडे संघ अन् लोह्यात 'LPL' चा 'फिव्हर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:47 IST2025-12-30T17:45:27+5:302025-12-30T17:47:30+5:30
आयपीएलच्या धर्तीवर लोहा प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंचा लिलाव; विशाल जाधव ठरला ''मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर''

गल्लीतल्या खेळाडूंना मिळालं 'IPL' सारखं ग्लॅमर! ८ तगडे संघ अन् लोह्यात 'LPL' चा 'फिव्हर'
- गोविंद कदम
लोहा (नांदेड): आयपीएलच्या धर्तीवर गेल्या १५ वर्षांपासून लोहा शहरात क्रीडाप्रेमींचे आकर्षण ठरलेल्या 'लोहा प्रीमियर लीग' (LPL) च्या १६ व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. यंदा या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंसाठी राबवण्यात आलेली जाहीर लिलाव प्रक्रिया. या लिलावात विशाल जाधव या खेळाडूवर 'रायजिंग स्टार लोहा' संघाने सर्वाधिक १४ हजार रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. विशाल या हंगामातील 'मोस्ट व्हॅल्युएबल' खेळाडू ठरला आहे.
लोहा शहराचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय माणिकराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेने १६ व्या वर्षात पदार्पण केले असून, खेळाडूंची बोली लावून संघ निवडण्याची प्रक्रिया संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. २८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या लिलावात विशाल जाधवसह पंकज मोटरवार, राहुल चव्हाण, गौतम कापुरे यांसारख्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली.
८ संघांमध्ये रंगणार 'जंग'
तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजकांनी हा उपक्रम राबवला आहे. यंदा तिरंगा वॉरियर्स, टायगर इलेव्हन, लोहा लाइन्स, रॉयल किंग्डम, फ्रेंड्स इलेव्हन, रायजिंग स्टार, मुंबई इंडियन्स आणि युवा लेजंड्स असे ८ तगडे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या लिलाव प्रक्रियेमुळे लोह्यात आतापासूनच क्रिकेटचे वातावरण तापले असून, क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.