अजमेर उरुसासाठी मराठवाड्यातून धावणार 'विशेष रेल्वे'; ख्वाजांच्या दर्शनाला जाणं झालं सोपं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:05 IST2025-12-18T18:04:06+5:302025-12-18T18:05:55+5:30
रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; हैदराबाद-अजमेर विशेष गाडीने प्रवाशांची चिंता मिटली.

अजमेर उरुसासाठी मराठवाड्यातून धावणार 'विशेष रेल्वे'; ख्वाजांच्या दर्शनाला जाणं झालं सोपं!
नांदेड: अजमेर येथील जगप्रसिद्ध उरुसानिमित्त भाविकांची होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने हैदराबाद-अजमेर-हैदराबाद दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या गाड्या नांदेड विभागातील मुख्य स्थानकांवरून धावणार आहेत.
असे आहे रेल्वेचे वेळापत्रक
जाण्याचा प्रवास (गाडी क्र. ०७७३१): ही विशेष रेल्वे मंगळवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता हैदराबाद येथून सुटेल. ही गाडी नांदेड, हिंगोली, अकोलामार्गे गुरुवारी पहाटे ०२:१५ वाजता अजमेरला पोहोचेल.
परतीचा प्रवास (गाडी क्र. ०७७३२): परतीच्या प्रवासात ही गाडी शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी १८:५० वाजता अजमेर येथून सुटेल आणि सोमवारी सकाळी ११:०० वाजता हैदराबादला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा
मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला सिकंदराबाद, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम आणि चित्तोडगड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य
प्रवासादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या गाड्यांमध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास अशा सर्व प्रकारचे डबे जोडण्यात आले आहेत. उरुसासाठी जाणाऱ्या भाविकांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.