आत्यावर होती वाईट नजर; विरोध करताच चुलत साडूच्या मदतीने तिला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 13:16 IST2021-05-18T13:13:36+5:302021-05-18T13:16:59+5:30
घरात घुसून गैरवर्तन करत असताना विरोध केल्याने मारहाण केल्याने महिलेचा झाला मृत्यू

आत्यावर होती वाईट नजर; विरोध करताच चुलत साडूच्या मदतीने तिला संपवले
नांदेड : सोबत येण्याचा तगादा लावल्यानंतर समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आत्याचा आरोपीने चुलत साडूच्या मदतीने खून केला. ही घटना नायगाव तालुक्यातील धानोरा येथे १६ मे रोजी दुपारी घडली. यानंतर पळून जाणाऱ्या दोन्ही आरोपींना नागरिकांनी बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
धानोरा येथील शांताबाई किशन जाधव (५५) ही महिला १६ मे रोजी दुपारी घरी असताना २ वाजण्याच्या सुमारास करण शंकर भांगे (रा. बोळेगाव) व त्याचा चुलत साडू जेजेराव हे दोघेजण घरी आले. यावेळी करणने त्याची आत्या शांताबाई यांना ‘मला तू आवडतेस, माझ्यासोबत चल’ म्हणून तगादा लावला. यावर शांताबाई यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या जेजेरावने शांताबाई यांना मारहाण केली, तर करणने त्याच्या हातातील कड्याने शांताबाईंच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे शांताबाई बेशुद्ध झाल्या.
ही बाब बाहेरुन आलेल्या शांताबाई यांच्या मुलीला समजल्यानंतर तिने आरडाओरड केली. त्यामुळे दोन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी दोघांनाही चोप देत बांधून ठेवले. मात्र, या मारहाणीत शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी शीतल सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एन. केेंद्रे करत आहेत.