...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा
By सुमेध उघडे | Updated: October 20, 2020 19:11 IST2020-10-20T19:08:39+5:302020-10-20T19:11:07+5:30
ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये फाटे फोडण्याचे राजकारण सुरु आहे.

...तर दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील; पंकजा मुंडेंचा इशारा
नांदेड : ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर मी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या दुर्गाष्टमीपर्यंत हा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करणार आहे. त्यानंतर ऊसतोड कामगार 'दुर्गे'चा अवतार घेतील असा इशारा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ऊसतोड कामगार सध्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ऊसतोडणी सुरु करणार नसल्याचे कामगारांनी जाहीर केले आहे. यावर तोडगा निघत नसल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे असताना लवादाच्या दोन बैठकांत ते विषय मार्गी लावत होते. आताही तीच परंपरा सुरु ठेवण्यात येईल. ऊसतोड कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये फाटे फोडण्याचे राजकारण सुरु आहे. साखर कारखानदार, साखर संघाने हा विषय लवकर सोडवावा अन्यथा दुर्गाष्टमीनंतर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सरकारने अत्यंत उदार अंतकरणाने मदत दिली पाहिजेhttps://t.co/ycaPoAHoQY
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 20, 2020
सरकारने उदार अंतकरणाने मदत करावी
मंगळवारी नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी, पार्डी आणि कारेगाव या ठिकाणी त्यांनी नुकसानीची पाहणी केली.यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी उपाशी राहिला नाही पाहिजे. सध्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाने भेद केला नाही. त्यामुळे सरकारनेही भेद करु नये. अस्मानी संकट आलेले असताना सुलतानी संकटापासून वाचविण्याची जबाबदारी सरकारची आहे.त्यासाठी अत्यंत उदार अंतकरणाने मदत दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.