Sita river in Mudkhed is dry | मुदखेडातील सीता नदी पडली कोरडी
मुदखेडातील सीता नदी पडली कोरडी

ठळक मुद्देभीषण पाणीटंचाई संकट इसापूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणीवन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

मुदखेड : या वर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील मुख्य जिवनदायनी असलेली सीता नदी कोरडी पडली असून या वन्यप्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच चित्र आहे.
टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शासनाने या बाबतीत गंभीर दखल घेऊन या परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीतानदीला तात्काळ सोडावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
मुदखेड तालुक्यातील मुदखेड, बारड, निवघा, शेंबोली, पांढरवाडी, डोंगरगाव, पार्डी, वैजापुर, बोरगाव हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. इसापूर धरणातील पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके भाजीपाला घेत सुखी समाधानी जिवन जगतो आहे. परंतु या धरणातून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते.
मे च्या कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सीता नदीत सोडावे अशी एकमुखी मागणी होत आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सीता नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. बोरवेल बंद पडले आहेत.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसराला बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाºया गावांना होणारा जलपुरवठा पुर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे.
पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील शेतक-यांकडून होत आहे.
केळीच्या बागा पाण्याअभावी करपल्या
सीता नदीला पाणी सोडले नाही तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनवरांचे प्रमाण फार मोठे आहे.
प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, केळीच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे.
स्तसेच शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी ईसापूर धरणातील पाणी सोडावे.


Web Title: Sita river in Mudkhed is dry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.